नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महानगरासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचे (Rain) धूमशान सुरू झाले आहे. शनिवारी रात्री सुरू झालेला धुव्वाधार पाऊस पहाटेपर्यंत सुरूच होता. जिल्ह्यातील (District) अनेक तालुक्यांना परतीच्या पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू झालेला ऑक्टोबर महिना पाऊस संपण्याच्या बेतात असताना कोसळतच आहे. त्यामुळे ‘नाशिक जिल्हा,पावसाचा बालेकिल्ला’ असे समीकरण झाल्याचा अनुभव जिल्ह्यातील रहिवाशांना येत आहे. रविवार पहाटेपर्यंत जोरदार बरसणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा पिकांची धूळधाण केली. सोंगणी झालेली आणि सोंगणीला आलेली भात पिके, कांदा, टोमॅटो, द्राक्षबागा, भाजीपाला आदी पिकांना या पावसाने फटका बसला. नद्या-नाल्यांना पुन्हा पूर आला आहे. आताच्या पावसाने द्राक्षांचा हंगाम गेल्यात जमा असल्याने द्राक्षबागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेता शेतांत पाणी साचून वाहत असल्याचे चित्र काही भागात पाहावयास मिळत आहे.
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, नांदगाव तालुक्यांसह सर्वत्र मुसळधार पाऊस (Heavy rains) झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. महिनाभरापूर्वी दणक्याने अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांचे अपरिमित नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना सरकारी मदतीची प्रतीक्षा आहे. दिवाळीची सुट्टी संपून सरकारी कार्यालये आता सुरू होतील. मदतीचे पैसे बँक खात्यावर केव्हा जमा होतात याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले असताना शनिवार रविवारच्या पावसाने शेतकन्यांना पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. इगतपुरी तालुक्यात शनिवारी रात्री नऊच्या सुमारास वादळ आणि विजांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस झाला. एकाच दिवसात तालुक्यात ९५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सुमारे दोन तास झालेल्या पावसामुळे काढणीसाठी आलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्र्यंबकेश्वरसह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. रात्री सलग दोन अडीच तास संततधार पाऊस झाल्याने रस्त्यांवरून पाणी वाहत होते.
सिन्नर शहरासह तालुक्याच्या (Sinnar Taluka) ग्रामीण भागात शनिवारी रात्री दोन ते तीन तास संततधार पाऊस झाला. रविवारी (दि.२६) सायंकाळी जोरदार पावसाने तासभर हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शहरातील नागरिकांसह व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली. सणासुदीच्या दिवसांत दररोज सायंकाळी पाऊस पडत असल्याने व्यावसायिकांना त्याचा फटका बसत आहे. निफाड तालुक्याच्या पूर्वभागाला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधारेने परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले. गोळेगाव, गोंदेगाव, आणि मरळगोई गावांत पावसाचा जोर अधिक होता. परिसरातील गोई नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी शेतात शिरले आहे. अनेक ठिकाणी बंधारे फुटल्याने पुराचे पाणी थेट शेतातील पिकांत शिरले. नद्यांचे पाणी तुंबल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. मका पिकाला त्याचा मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खडकमाळेगाव परिसरात झालेल्या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. शेता-शेतातून पाणी वाहत होते. मका, टोमॅटो, कांदा, सोयाबीन, भाजीपाला तसेच द्राक्षबागामधून पाणी वाहिले. त्यामुळे सर्वच पिकांसाठी हा पाऊस बाधक ठरणार आहे.
लासलगावसह परिसरातील गावांना शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत पावसाने झोडपून काढले. रात्रभर कोसळलेल्या जोरदार पावसाने येथील शिवनदीला दुसऱ्यांदा पूर आला.निमगाव वाकडा येथील बंधाऱ्यावर खडकावरून पाणी पडत असल्याने तयार झालेला धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. पिंपळगाव नजीक भागातील शेतकऱ्यांवर पुन्हा दुहेरी संकट ओढवले आहे. काढणीसाठी आलेला लाल कांदा आणि नुकतीच लावलेली कांद्याची रोपे पिके पाण्याखाली गेल्याने ती सडून नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.येवला तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत. भाटगाव येथे अण्णासाहेब मिटके यांच्या घराची भिंत कोसळली. रायते व चिचोंडी खुर्द गावांना जोडणाऱ्या अगस्ती नदीवरील पुलाचा भराव पुरात वाहून गेला आहे.
नाशकात मुसळधार
नाशिक महानगरात शनिवारी सायंकाळी सातपासून पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. रविवारीही दिवसभर पाऊस सुरू होता. शनिवारी सायंकाळी साडेपाच ते साडेआठपर्यंत १०.४ मि.मी. पाऊस झाला. रात्री साडेआठ ते रविवारी सकाळी साडेआठपर्यंत २८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभर कमी-अधिक पाऊस पडला. सायंकाळी त्याचा जोर वाढला. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत असल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.
इगतपुरीत ९६ मि.मी.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागांत परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. याचा तालुक्यातील २९ हजार हेक्टर भातशेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. शनिवारच्या मध्यरात्रीपासून चार तासांत तालुक्यात ९६ मि.मी. पाऊस झाला. या महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस असल्याची नोंद झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होत असल्याने शेतकन्याच्या डोळ्यांत आसवे दाटली आहेत. भात पिकासोबतच फळबागा आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले.
जिल्ह्यातील स्थिती
- कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान,
- मनमाडमध्ये नद्यांना पुन्हा पूर.
- सिन्नरला सलग दोन दिवस पावसाने झोडपले.
- येवल्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर.
- इगतपुरीत वादळ, विजांच्या गडगडाटासह मुसळधार.
- दिंडोरीत शेतांत पाण्याचे तळे, पांडाणेत द्राक्षबागांना फटका.
- घोटीत भातशेतीवर पावसाचा घाला; चार तासात मि.मी.पाऊस.
- निफाड तालुक्यात कांदा, द्राक्ष, मकांवर पावसाचा कहर, शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याची
शक्यता.




