Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकहोळीसाठी नाशिककर सज्ज

होळीसाठी नाशिककर सज्ज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

होळीचा सण ( Holi Festival )मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. दिवाळीनंतरचा भारतातील सर्वात मोठा सण होळी उत्सव दोन दिवस चालणार आहे. सोमवारी सायंकाळी होलिका दहन उत्सवापासून धूळवड व रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा होणार आहे.

- Advertisement -

यावर्षी होळी 6 मार्च रोजी आहे. पौर्णिमा 6 मार्चला दुपारी 4:17 वाजता सुरू होते आणि 7 मार्च रोजी संध्याकाळी 6:09 वाजता समाप्त होणार आहे. त्यमुळे होलिका दहन सोमवारीच होईल.नाशिककर अत्यंत उत्साहात होळी आणि धूलिवंदन साजरे करत आले आहेत. यंदाही रहाडी खोदण्यास सुरुवात झाली आहे. रंगात माखणे, होळीच्या राखेने धूळवड खेळणे नाशिककरांच्या आवडीचे आहे.

मंगळवारी धुळवडीच्या दिवशी परंपरेप्रमाणे वीर नाचवण्याची प्रथा जपली जाणार आहे. विविध वेशभूषेने नटलेल्या चिमुरड्यांसह जथ्थेच्या जथ्थे यशवंत महाराज पटांगण येथे जातील. कडू-गोड आठवणींना तिलांजली देत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. बाजारपेठेत गोवर्‍या, हार-कडे विक्रीसाठी आले आहेत. नाशिक रंगारंग होणार आहे.

…पोळी करा दान; अंनिसचे आवाहन

मानवी समाजातील एकोपा वाढावा, तणावमुक्ती व्हावी व सर्वांना आनंद मिळावा, यासाठी सण- उत्सव, समारंभ साजरे करणे अतिशय महत्त्वाचे असते. मात्र हे सण-उत्सव, समारंभ साजरे करताना पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहील, याचे भान ठेवणे, काळजी घेणेही अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मागील तीस वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वच सण-उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी कृतिशील प्रबोधनाचे काम हाती घेतलेले आहे.

यावर्षीही महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ ह्या उपक्रमांतर्गत नाशिक शहरातून पुरणपोळी तसेच खाद्यपदार्थ होळीत न टाकता त्यांचे दान करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. होळीच्या ठिकाणी संकलित झालेल्या पुरणपोळ्यांचे गरजू आणि गरीब कुटुंबात, अनाथाश्रमात वाटप करून त्यांच्या पोटातील भुकेची आग शमविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे निर्मूलन समितीेचे कृष्णा चांदगुडे, समीर शिंदे, नितीन बागुल, महेंद्र दातरंगे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या