दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
गुजरात राज्यातून मद्य व गुटख्याची तस्करी होणे नित्याचे झाले आहे. रोज नवनवीन फंडे वापरून गुटखा व मद्याची तस्करी केली जात आहे. अशातच आता चक्क गुजरात राज्य परिवहनच्या बसमधून १ लाख १४ हजार किंमतीचे मद्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून बस चालक व वाहकांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे…
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी निवडणुक आयोग, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये संपुर्ण नाशिक जिल्ह्यात सत्वर कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या होणारी मद्याची वाहतुक व विक्री रोखण्यासाठी जिल्हयाचे सीमावर्ती भागांमधील चेकपोस्टवर सतर्क नाकाबंदी लावून अवैध कारवायांना प्रतिबंध घालण्यात येत आहेत.
त्यानुसार आज सोमवार दि. १८ मार्च २०२४ रोजी गुजरात राज्य परिवहन महामंडळ (जीएसआरटीसी), नाशिक सुरत बस क्रमांक (जीजे-१८ झेड ८९७०) या बसमधून मद्याची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे स्था.गु.शा.चे पथकाने नाशिक ते सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात सापळा रचुन गुजरात राज्यात जात असलेली वरील बस थांबवुन तपासणी केली असता त्यामध्ये ०१,१४,६३५ रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा विनापरवाना अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आलेला आहे.
तसेच याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुरनं 138/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात विजय विनोद बलसार (52) रा. सुरत (बस चालक), अमृतभाई भुवनभाई पटेल (56) रा. सुरत (बस वाहक) यांना अटक करण्यात आली आहे. तर सदर गुन्ह्यात पुढील तपासात किस्मत बॅन्डी शॉप, पंचवटी, नाशिक याचे मालक तसेच अवैध मद्यसाठ्याच्या वाहतुकीस मदत करणारे इसमांना पाहिजे आरोपीत दर्शविण्यात आले आहे. अशा पध्दतीने अन्य कोणी वाईन शॉप चालक / मालक अवैधरित्या मद्याची विक्री, तस्करी करीत असल्यास त्याचेबाबत अधिक माहिती घेवून राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या मदतीने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
दरम्यान, सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रामणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलिस हवालदार प्रविण सानप, किशोर खराटे, पो. कॉ. जाधव, बोडके, मोरे यांच्या पथकाने केली आहे.