Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Sinnar Politics : खासदार वाजेंच्या उमेदवारांकडे सर्वांच्या नजरा; सेना-भाजप युती संकटात?

Nashik Sinnar Politics : खासदार वाजेंच्या उमेदवारांकडे सर्वांच्या नजरा; सेना-भाजप युती संकटात?

सिन्नर | विलास पाटील | Sinnar

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांना भेटून आघाडीचे नेतृत्व घटक पक्षांनी खासदार राजाभाऊ त्यांच्यावर सोपवले आणि घटक पक्षांना काही जागा देण्याची विनंती केली. काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाने एकदोन जागांची मागणी त्यांच्याकडे केल्याचे समजते. त्याबाबत अजून निर्णय झाला नसला तरी महाआघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

- Advertisement -

डॉ. संदीप मोरे हे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून (Shivsena) तगडे दावेदार मानले जात होते. मात्र, उमेदवारीबाबत कुठलाही निर्णय होत नसल्याने आणि स्वतःचे पुतणे पंकज मोरे यांचेच नाव पुढे आल्याने त्यांनी थांबून घेतल्याची चर्चा होती. शेवटच्या क्षणी डॉक्टरांनाही उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा आहे. त्यांच्याशिवाय माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती अॅड. राजेंद्र चव्हाणके व माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांना उमेदवारी देता येणार नसल्याचे ना. कोकाटे यांनी स्पष्ट सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाराज झालेल्या या दोघांपैकी कोणी शिवसेनेत गेले आणि त्यांचा उमेदवारीसाठी विचार झाला, तर कुणाला आश्चर्य वाटायला नको. कोकाटे यांच्या पाठोपाठ खासदार वाजे यांनीही आपल्या प्रभागातील इच्छुकांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्याचे समजते.

YouTube video player

त्याप्रमाणे अनेक प्रभागातील इच्छुकांनी आज अर्ज दाखल केलेही आहेत. खासदार वाजे यांच्याकडून इच्छुक असणा-यांची अर्ज दाखल करण्यासाठी सुरु असलेली धावपळ पाहता वाजे यांच्याकडून फोनाफानी झाल्यावर शिक्कामोर्तब होत आहे. काँग्रेसच्यावतीने शहरराध्यक्ष मुजाहिद खतीब यांच्या पत्नीचा अर्ज आला असून कम्युनिस्ट पक्षाकडून हरिभाऊ तांबे प्रभाग तीनमधून अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास आघाडीतील दोन-तीन जागा देऊन उर्वरित जागा सेना लढवेल, असाच संदेश मिळत आहे.

नशिबात राजयोग नाही

कोकाटे यांच्याकडून एक त्यांचा समर्थक उपनगरातील एका प्रभागातून इच्छुक होता. तशी मागणी त्याने कोकाटे यांना भेटून केली होती. त्याची पत्नी यापूर्वी नगरसेवकही होती. पत्नीसह इच्छुक अर्ज दाखल करण्यासाठी नगरपरिषदेत आल्यानंतर त्याला त्याच्या उमेदवारीबाबत काहींनी छेडले. त्यावर तो म्हणाला, काय करणार? नेत्याने पत्नीला अर्ज दाखल करायला सांगितलं. त्यावर तुमच्या नशिबात राजयोग नाही, वहिनींच्याच नशिबात राजयोग असे, असे बघ्यामधील एकाने म्हणताच, इच्छुकांसह सर्वांमध्येच हशा पिकला.

… तर सोन्याहून पिवळं

नगरसेवक पदासाठी कोकाटे यांच्याकडून एकाने अर्ज दाखल केला. या उमेदवाराला खरंतर त्याच प्रभागातील दुसऱ्या उमेदवाराने आग्रह करून अर्ज दाखल करायला लावला. यापूर्वी ४-५ वेळा नगरसेवक असलेल्या या माजी नगरसेवकाचा प्रभाग महिलासाठी राखीव झाल्याने त्याने आपल्या पत्नीला उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आपली उमेदवारी पक्की आहे, मात्र सोबतचा उमेदवार आपल्या सोयीचा पाहिजे म्हणून त्याची चाचपणी सुरूच होती. त्याने एकाला त्यासाठी पटवले. साहेबांकडून उमेदवारी आणायची जबाबदारी माझी, असा शब्द दिल्याने इच्छुकाने धावपळ करत दोन दिवसात अर्ज दाखल केला. मात्र, त्याचवेळी साहेबांनी दुसऱ्या इच्छुकाला उमेदवारी दिल्याची आणि तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्ज घेऊन बसल्याची माहिती त्याला मिळाली. त्यावर काहींनी छेडताच, उमेदवारी मिळाली तर चांगलं, नाही मिळाली तर त्याहून चांगलं, अगदी सोन्याहून पिवळं, असे म्हणत हा इच्छुक थोडासा नाराजीनेच नगरपरिषदेतून बाहेर पडला.

सेना-भाजप युती संकटात?

नगराध्यक्षपदासाठी कोकाटे, वाजे यांच्याप्रमाणेच भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. उदय सांगळे यांनी भाजप प्रवेश केल्यापासून ‘भाजपतीलही अनेकांना उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीचे माजी व्हा. चेअरमन किशोर देशमुख तर आधीच प्रचारालाही लागले होते. सोशल मीडियावर त्यांनी जाहिराती सुरूही केल्या होत्या. अगदी घरोघर त्यांची पत्रके जाऊन पडली होती. मात्र, माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर देशमुख यांनी सोशल मीडियावरील जाहिराती थांबवल्याची चर्चा आहे. वाजे यांच्या प्रवेशापूर्वीच भाजप व शिवसेना शिंदे गटाने ‘भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव, उदय सांगळे व माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा केली होती. तेव्हाच वाजे यांच्या प्रवेशाबाबत व त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू असल्याचे बच्छाव यांनी स्पष्ट सांगितले होते. वाजे यांच्या प्रवेशानंतर त्यांचे भाजपचे तिकीट फायनल झाल्याचे मानले जात आहे. असे असताना शिवसेना शिंदे गटाच्या तालुक्यातील काही नेत्यांकडून, शहरातील काही शिवसेनेच्या जुन्या निष्ठावान नेत्यांना गळाला लावण्यासाठी थेट नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्याची विनंती करण्यात येत आहे. नगरपरिषदेत आपल्या प्रभागातील दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या या नेत्याला फोन आला.

शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरण्याची गळ त्यांना घालण्यात आली. त्यावर सेना-भाजप युतीबद्दल या नेत्याने छेडताच, त्याची काळजी तुम्ही करू नका, फक्त अर्ज दाखल करा. बाकी आम्ही बघतो, असा विश्वास देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मी मूळ शिवसेनेचा निष्ठावान सैनिक आहे. मला ते जमणार नाही, असे नेत्याने ठणकावताच “आम्ही संध्याकाळी भेटतो’, असे सांगून सेनेच्या त्या नेत्याने फोन ठेवला. शिवसेनेने भाजपाकडे ५० टक्के जागांची मागणी केल्याची चर्चा असून दोन-चार जागांवर बोळवण करण्याचा प्रयत्न झाला, तर स्वतंत्र लढण्याची तयारी शिवसेनेने केल्याचे या फोनाफोनीवरून स्पष्ट होत आहे. शहरातीलच एका उपनगरात भाजपच्या वतीने एका इच्छुकाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार हा इच्छुक व त्याचा मित्र परिवार प्रचाराच्या कामाला लागले. कागदपत्रांची जुळवाजुळव करून नगरपरिषदेत अर्ज दाखल करण्यासाठी जाण्याची तयारी करत असतानाच ‘भाजपकडून या इच्छुकाला भ्रमणध्वनी आला. तुम्ही भाजपऐवजी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अर्ज दाखल करा, असे त्याला सांगण्यात आले. त्यावर आपल्या प्रभागातील जातीय समीकरणांचा विचार करता भाजपचीच उमेदवारी करावी लागेल, अशी विनंती इच्छुकाने वारंवार केली. तरीही समोरून शिंदे गटाचाच आग्रह होत होता. मी भाजपकडूनच इच्छुक असून सेनेकडे मी उमेदवारी मागितलेली नाही, असे सांगूनही पेच न सुटल्याने, अर्ज दाखल करण्याऐवजी या इच्छुकाने थेट भाजपच्या कार्यालयाकडे धाव घेतल्याचे समजते.

अवघ्या पाच तासात ठरले उमेदवार !

नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ४८ तासांवर आली होती. तरीही ना. माणिकराव कोकाटे येत नसल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील इच्छुकांची घालमेल सुरू होती. अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी, दिनांक १४, दुपारी तीनच्या दरम्यान कोकाटे यांचे तालुका दूध संघाच्या विश्रामगृहावर आगमन झाले. कोकाटे यांनी उमेदवार निवडीची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आणि आपल्या स्वभावाप्रमाणे अवघ्या पाच तासांत ९० टक्के पेक्षा जास्त उमेदवार फायनल करून ते दूध संघाच्या कार्यालयातून बाहेरही पडले. कोकाटे आल्याचा निरोप मिळताच इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी दूध संघाच्या कार्यालयाकडे धाव घेतली. येणाऱ्या इच्छुकांना किंतु परंतु मध्ये अडकवून न ठेवता, ज्यांना उमेदवारी द्यायची त्यांना थेट पक्षाच्या वतीने अर्ज दाखल करण्यास त्यांनी सांगितले. ज्यांना उमेदवारी द्यायची नाही, त्यांना तसे स्पष्ट सांगण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. प्रत्येक प्रभागातील जातीय समीकरणांबरोबरच निवडून येण्याचे गणित करीत त्यांनी काहींना कामाला लागण्याच्या सूचना केल्या. खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडून निवडणुकीसाठी इच्छुक असणारे दोन इच्छुकही या गर्दीत कोकाटे यांना भेटले. प्रभागातील गणित जुळते म्हटल्यावर त्यांना थेट उमेदवारीही त्यांनी देऊन टाकली, एक-दोन प्रभाग वगळता जवळपास सर्वच प्रभागांतील उमेदवार त्यांनी निश्चित केले.

हर्षद देशमुख यांची उमेदवारी फायनल झाली. मात्र, त्यांना सोबत महिला उमेदवार कोण द्यायची यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. शिवसेना (उबाठा) चे उदय गोळेसर यांच्या समोर तसेच पंकज मोरे यांच्या समोर तगडे उमेदवार मिळत नसल्याने या दोन्ही जागांसह या प्रभागातील महिलांची नावे निश्चित होऊ शकली नाहीत. संजोग नाईक यांना उमेदवारी देग्याचा शब्द आधीच दिलेला असताना, त्यांनी स्वतःच्या ऐवजी भाऊ सुदर्शन यांचे नाव पुढे केल्यानंतर कोकाटेयांनी थेट नकार देत, संजोग यांनाच उमेदवारी करावी लागेल, हे ठणकावून सांगितले. प्रशांत सोनवणे, पंकज जाधव, सागर भाटजिरे, शेखर गोळेसर, किरण गोजरे यांच्यासह अनेक नवीन चेहयांना त्यांनी संधी दिली. माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देणे अवघड असल्याचे सांगतानाच, तुमच्यासारख्या अनुभवी कार्यकर्त्यांची नगरपरिषदेत गरज भासेल, असे सांगून त्यांना प्रभाग ९ मधून नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्याची सूचना केली. त्याच वेळी ओनक वर्षांपासून याच प्रभागात लढण्याची तयारी करणाऱ्या अजय गोजरे यांना दुसऱ्या प्रभागातून लढण्यास सांगितल्याचे समजते. दोन-चार अपवाद वगळता जवळपास सर्वच उमेदवारांना कामाला लावून रात्री आठच्या दरम्यान कोकाटे दूध संघाच्या विश्रामगृहातून बाहेर पडले आणि गेल्या दहा-बारा दिवसांपासून उमेदवारांबाबत असलेला सस्पेन्सही संपला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...