नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. देशदूत – सल्लागार संपादक
वक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।।॥
तेणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ।।२।।
आकाश मंडप पृथिवी आसन। रामे तेथे मन क्रीडा करी ॥३॥
कथा कमंडलू देह उपचार। जाणवितो वारा अवसरु ।।४।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार। करोनी प्रकार सेवू रुची ।।५।।
तुका म्हणे होय मानसी संवाद । आपुलाची वाद आपणासी ।।६।।
- संत तुकाराम
संत तुकारामांनी आपल्या अभंगवाणीतून वृक्षवल्लींची महती सतराव्या शतकात सांगितली. ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ अशी सुरुवात करुन ‘आपुलाचि वाद आपणासी’ या कवणाने या अभंगाचा शेवट केला. सध्या तपोवनातील वृक्षतोडीच्या विषयात साधारणपणे असेच चाललेय. चारशेहून अधिक वर्षे झाली तरी आपण सुधारायला तयार नाही, हेच तपोवन प्रकरणातून दिसून येते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ याचा अर्थच मुळी झाडे, वन्यजीव हे आपले सगेसोयरे आहेत. कारण ते आपल्याला अनेक प्रकारे मदत करतात आणि ते पर्यावरणासाठी आवश्यक आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ही ओळ पर्यावरणाचे महत्त्व आणि निसर्गाशी असलेले आपले नाते समजावून सांगते. निसर्गातील झाडे, वेली आणि जंगलातील प्राणी हे आपले मित्र आणि कुटुंब आहेत. त्यांच्यामुळे आपले जीवन समृद्ध होते आणि त्यांचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे, असा या अभंगाचा मथितार्थ !
परंतु संस्कृतीचा ठेका घेतल्याची बतावणी जे करतात, त्यांनी मात्र ‘एकाच्या बदल्यात दहा’ अशी सौदेबाजीची भाषा करुन एकूणच पर्यावरण या विषयाचीच वाट लावली. या विषयावर विविध माध्यमांमधून भरपूर लिहून आले. राजकीय नेते, विशेषतः भाजपविरोधी, अभिनेते, विद्यार्थी, कवी आणि अर्थातच वृक्षप्रेमी, पर्यावरणरक्षक अशा समाजातील जवळपास सर्वच घटकांनी तपोवनातील झाडांच्या सर्रास होऊ घातलेल्या कत्तलीला विरोध केला आहे. अगदी त्यासाठी प्राणपणाने लढण्याचीही तयारी किमान सर्वांच्या वर्तनातून तरी दिसते. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीही वृक्ष तोडले जाणार असेल तर असले पाप शिरावर घेऊन सिंहस्थात कोणत्या तोंडाने येऊ, अशी चिंता व्यक्त केली. अविमुक्तेश्वरानंद हे भाजपविरोधी वक्तव्यांसाठी प्रसिध्द असल्याने भाजपचे नेते त्याचाही आपल्या सोयीसाठी कदाचित उपयोग करतील. परंतु सध्या वृक्षतोडीविरोधात जनमत दिवसेंदिवस अधिकाधिक उग्र बनत चालले असल्याने हा संघर्ष चांगलाच धगधगू लागला आहे. कडाक्याच्या थंडीत ही धग, महापालिका व नेत्यांना आणखी काही निर्णयही घ्यायला कदाचित प्रवृत्त करीत आहे की काय असे वाटावे, अशी त्यांची पाऊले पडत आहेत.
तपोवनातील संभाव्य साधूग्रामच्या जागेवर नवी दिल्लीच्या प्रगती मैदानाच्या धर्तीवर कायमस्वरुपी प्रदर्शन केंद्र म्हणजेच ‘एक्झिबिशन सेंटर’ उभारण्याची कल्पना काहींनी लढवली आहे. सिंहस्थ मेळ्याप्रसंगी तेथे साधूग्राम असेल व नंतर तेथे प्रदर्शन केंद्र राहील. ज्याच्या उत्पन्नातून पालिकेलाही काही उत्पन्न मिळू शकेल, असे सांगितले जाते. खरे तर ही कल्पना जुनीच आहे, पण तेव्हा त्याला चालना मिळू शकली नाही. आता कोणीतरी ‘ठेवणीतील उद्योगपती’ पुढे आणून या जागेची विल्हेवाट लावण्याचा निर्णय झालेला दिसतो.
वृक्षतोडीवरुन एकीकडे संघर्ष चालू असतानाच या सेंटरसाठी निविदाही प्रसिध्द करण्याची बदमाशी पालिकेने केली आहे. हा जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार झाला. दिवसेंदिवस हा विषय चिघळत असताना त्यात सामोपचाराचे चार शब्द जबाबदार लोकांकडून येण्याऐवजी तो अधिक पेटता राहील, अशी एक व्यूहरचना चाललेली दिसते. मधूनच तपोवनातील सगळ्याच मठ-मंदिरांची जागाही पालिका ताब्यात घेणार असल्याची माहिती पुढे येते. याबाबत पालिका आयुकत आपली ‘सरकारी जबाबदारी’ पार पाडत असल्याचे दिसत असले तरी त्यांच्या मागे नेमके कोण आहेत, हे एव्हाना नाशिककरांना कळून चुकले आहेच. पण आश्चर्य याचे वाटते की शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. अद्याप या विषयावर या तिघांनीही मौन पाळले आहे.
तपोवन ज्या विधानसभा मतदारसंघात येते त्या नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार राहुल ढिकले हे भाजपचेच असूनही त्यांचे, ‘हाताची घडी तोंडावर बोट’ वर्तन संतापजनक आहे. अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या विषयावर आपली स्पष्ट व थेट भूमिका मांडल्यानंतर काही भक्तसंप्रदायाने त्यावर केलेली मल्लिनाथीही अप्रस्तुत तर होतीच, पण हा विषयच भरकटवण्याचा हेतू त्यातून दिसला. सिंहस्थ व्हावा, त्याला कोणाचाच विरोध नाही. परंतु नाशिकच्या ‘प्राणवायूची केंद्रे’ म्हणून ज्याची ओळख सांगितली जात आहे, त्याला नख लावण्याचा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही, असाच निर्धार नाशिककरांच्या वाढत्या प्रतिसादातून दिसतो आहे.
मध्यंतरी चुंचाळे येथील पांजरापोळच्या अशाच वृक्षवल्लींनी समृध्द अशा जागेवर राजकीय नेत्यांची वाईट नजर पडली होती. ती जागा तर खासगी असूनही त्याची लचकेतोड होता होता टळली. तेव्हाही पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी तो कट हाणून पाडला होता. चुंचाळे पांजरापोळच्या जागेचा घास घेण्याची हौस भागली नाही म्हणून त्याच शक्ती आता तपोवनातील शेकडो झाडांच्या कत्तलीच्या माध्यमातून तेव्हा राहून गेलेली भूक भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नाशिककरांनी हे सगळेच विषय समजून घ्यायला हवेत. पांजरापोळ जागा, भालेकर शाळा आणि आता तपोवन ही सारी क्रोनोलॉजी तपासायला हवी. विकासाच्या नावाखाली नाशिकचा शांत, सुंदर देखणेपणा हिरावून घेण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. हा ‘आपुलाची वाद आपणासी’ असा प्रकार असून संत तुकारांमांनी या सगेसोयऱ्यांना वाचवायला तेव्हाच सांगितले आहे, याचा विसर पडता कामा नये.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





