Friday, May 15, 2026
HomeनाशिकNashik TCS Case : एसआयटीने 'ऑपरेशन संभाजीनगर' फत्ते कसं केलं? निदा खान...

Nashik TCS Case : एसआयटीने ‘ऑपरेशन संभाजीनगर’ फत्ते कसं केलं? निदा खान जाळ्यात कशी अडकली?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या २५ दिवसांपासून पोलिसांना (Police) गुंगारा देणारी टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान (Nida Khan) अखेर नाशिक शहर पोलिसांच्या (Nashik City Police) जाळ्यात अडकली आहे. या अटके मागे एआयएमआयएमचे संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची एक मुलाखत आणि नाशिक संभाजीनगर पोलिसांनी राबविलेले ‘संयुक्त ऑपरेशन’ अत्यंत कळीचे ठरले. या कारवाईने धर्मांतर प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, निदाला आश्रय देणाऱ्या एका नगरसेवकावरही गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे तपासात जे जे व्यक्ति निष्पन्न होतील, त्यांच्यावर गुन्हे नोंद होणार आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी, ‘मी निदा आणि तिच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे’, असे विधान केले होते. हाच धागा पकडून नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तांत्रिक तपासाचे आदेश एसआयटीला दिले होते. एसआयटी प्रमुख व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ९०० पेक्षा जास्त सीडीआर आणि एसडीआर तपासले असता एक संशयास्पद नंबर रडारवर आला. हा नंबर दिवसातून केवळ १५-२० मिनिटे सुरू व्हायचा आणि पुन्हा स्विच ऑफ व्हायचा. हा नंबर छ. संभाजीनगरमधील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याचा असल्याचे निष्पन्न झाले.

हे देखील वाचा : Nashik TCS Case : धर्मांतरासाठी ‘डिजिटल ब्रेन वॉशिंग’; निदा खानला चार दिवसांची पोलीस कोठडी

निदा खान ही संभाजीनगरमधील मुस्लिमबहुल नारेगाव भागात पटेलने पुरविलेल्या आश्रित रुममध्ये पती व्यतिरिक्त कुटुंबासह लपून बसली होती. हा परिसर अत्यंत संवेदनशील असल्याने थेट कारवाई करणे धोक्याचे होते. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी छ. संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी ‘सिक्युरिटी रिझन्स’चे कारण पुढे करत संभाजीनगरमधील सर्व नगरसेवकांना सीपी ऑफिसला पाचारण केले. मतीन पटेल तेथे येताच खुद्द प्रवीण पवार यांनी त्याची चांगलीच हजेरी घेतली. त्यानंतर त्याने अनेक ‘पत्ते’ ओपन करत सहकार्य केले. त्याने निदाला लपविण्याचे ठिकाण सांगताच दोन्ही शहरांच्या गुन्हेशाखेतील सर्चिग टीमने अतिशय सावधगिरीने कूच करत निदाला नारेगाव येथून ताब्यात घेतले. निदाला पकडणे हे मोठे आव्हान होते, मात्र तांत्रिक माहिती आणि स्थानिक राजकीय कनेक्शनचा छडा लागल्याने ही कारवाई यशस्वी झाली.

तपासाचे महत्त्वाचे मुद्दे

  • माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या मुलाखतीतील विधानाचा पोलिसांनी तांत्रिक अभ्यास केला.
  • एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याने निदाला आश्रय दिल्याचे उघड; त्याच्यावर नाशकात बीएनएस कलम २५९ नुसार गुन्हा दाखल.
  • वारंवार चालू-बंद होणाऱ्या एका संशयास्पद मोबाईल नंबरमुळे पोलिसांना संशयितापर्यंत पोहोचता आले.
  • नाशिक शहर गुन्हे शाखा आणि संभाजीनगर पोलीस यांच्यातील समन्वयामुळे संवेदनशील भागात यशस्वीरीत्या ‘ऑपरेशन’ पार पडले.
  • निदा खानला गुरुवारी पहाटे नाशिकमध्ये आणून सकाळी नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले.

ताज्या बातम्या

राज्याच्या पोलीस दलात मोठा फेरबदल; नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता...

0
मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र यांनी पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी गृह विभागांतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले....