नाशिक | प्रतिनिधी | Nashik
टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) दाखल गुन्ह्यात संशयित निदा एजाज खान (Nida Khan) हिला अटक करून शुक्रवारी (दि. ८) दुपारी नाशिकरोड न्यायालयात (Nashik Road Court) हजर करण्यात आले. यावेळी विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांनी मांडलेले गंभीर मुद्दे आणि तपासातील प्रगती विचारात घेता, न्यायालयाने निदा खानला ११ मेपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात संघटित ‘धर्मांतर किट’ असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसा युक्तिवाद मिसर यांनी केला.
नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) निदा खानचा माग काढत तिला छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरातून ताब्यात घेतले. अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिला रात्री उशिरा तेथील दंडाधिकाऱ्यांसमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. त्यावेळी एसआयटीप्रमुख संदीप मिटके उपस्थित होते. न्यायालयाच्या आदेशाने तिचा ताबा घेऊन नाशिक पोलिसांनी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर केले.
दरम्यान, विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर (Ajay Misar) यांनी निदा खानच्या पोलीस कोठडीची मागणी करताना न्यायालयासमोर (Court) दहा महत्त्वाचे मुद्दे मांडले. तसेच, निदाचे वकील अॅड. राहुल कासलीवाल यांनी निदाला पोलीस कोठडी मिळू नये, असा युक्तिवाद करून सरकार पक्षाच्या मागणीस विरोध केला.
मोबाईल ठरणार पुरावा
संशयित निदा खानचा मोबाईल जप्त करण्यात आला असून तो विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहे. त्यातील’डिलीट’ केलेला डेटा आणि व्हॉटस्अॅप चॅट्समधून या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेले आहेत का, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दोघे पुन्हा कोठडीत
मुंबई नाका पोलिसांत दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात नाशिकरोड कारागृहातून संशयित शाहरूक कुरेशी (वय ३४) आणि राख्मा मेमन (वय ३५) यांना पुन्हा अटक केली. त्यांना शुक्रवारी (दि. ८) नाशिक जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. १२ मेपर्यंत दोघांचीही ‘एसआयटी’ मार्फत पुन्हा कसून चौकशी होईल. पीडितेसोबत अश्लील संवाद साधत तिच्या खासगी आयुष्याबाबत वारंवार विचारणा करुन तिच्याशी अश्लिल वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा आहे.
आयोगाची माघार
टीसीएस धर्मांतर प्रकरणावर आक्षेप घेणारे पत्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने नाशिक पोलिसांना पाठवले होते. मात्र,पोलिसांनी सर्व गुन्ह्यांत न्यायालयात सबळ पुरावे सादर केले असून सर्व संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे आयोगानेच ‘संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तपासात हस्तक्षेप करणार नाही. यासह आम्ही स्वतःहून यापूर्वी दिलेले पत्र दातरी काढत आहोत’, या आशयाचे पत्र पोलीस आयुक्तालयास दिले आहे.
पोलीस कोठडी मिळण्याची कारणे
- पीडितेच्या मोबाईलमध्ये धार्मिक अॅप्स डाऊनलोड करणे आणि रिल्स/व्हिडिओद्वारे तिचे मतपरिवर्तन केल्याचा तांत्रिक तपास करणे.
- निदा पसार असताना तिला आश्रय देणारे आणि आर्थिक मदत पुखणारे सूत्रधार कोण आहेत, याचा छडा लावणे.
- पीडितेच्या घरी जाऊन नमाज व हिजाबची सक्ती करणे आणि तिवे नाव बदलून ‘हानिया’ करण्यामागच्या कटाची चौकशी करणे.
- पीडितेसाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात मालेगावमधील कोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे, हे शोधणे.
- पीडितेला नोकरीच्या बहाण्याने मलेशियाला पाठवण्याच्या प्रकरणातील निदाची भूमिका स्पष्ट करणे.
मुद्दे
- नाशिकरोड न्यायालयात इन कॅमेरा सुनावणी
- निदा ही गर्भवती असल्याने तिच्या आईला सकाळ- संध्याकाळ
- दोनदा भेटण्यास कोटनि परवानगी दिली.
- निदाने कशा पद्धतीने गुन्ह्यात मदत केली याची माहिती तपासी यंत्रणांनी दिली.
- निदाने पीडितेवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला.
- न्यायालयात सरकारी वकील, निदा हिचे वकील आणि तपासी यंत्रणांची उपस्थित
- सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक रोड न्यायालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त





