Wednesday, November 13, 2024
Homeनाशिकनाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा गोंधळ

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा गोंधळ

नाशिक जिल्ह्यातील 'या' तालुक्यांतील मतपेटीत आढळल्या जास्त मतपत्रिका

नाशिक | Nashik

विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड येथील वेअर हाऊसमध्ये सुरु आहे. ३० टेबलवर ही मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे १८० कर्मचारी मतमोजणी करत आहे. मात्र, या मतमोजणीवेळी काही मतदान केंद्रावरील मतपेटीत मतदानापेक्षा जास्त मतपत्रिका आढळून येत असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी गोंधळ; शिवसेनेने घेतला आक्षेप

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी काही वेळापूर्वी एका मतपेटीत तीन मतपत्रिका जास्त आढळल्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे यावर शिवसेनेने आक्षेप घेत मतमोजणीची प्रक्रिया काहीवेळ थांबविण्यात आली होती. तसेच चोपडा येथील २२ क्रमांकाच्या मतदान केंद्रात ९३५ मतदान झाल्याची नोंद होती.मात्र, याठिकाणी मतपेटीमध्ये ९३८ मतपत्रिका आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवरील मतपेटीमध्ये अधिक मतपत्रिका आढळून आल्या आहेत.

हे देखील वाचा : संपादकीय: हम चलेंगे साथ साथ..लेके हाथो मे हाथ

जिल्ह्यातील येवला आणि निफाड या मतदान केंद्राच्या मत पेटीमध्ये एक-एक मतपत्रिका ज्यादा आढळून आली आहे. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. तसेच अजूनही मत पत्रिकांचे गठ्ठे बांधण्याचे काम सुरु आहे. या मतपत्रिकांच्या सातत्याने होणाऱ्या घोळामुळे उमेदवारांकडून या मतपत्रिकांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पाच मतपत्रिका बाजूला काढून ठेवण्यात आल्या असून या मतपत्रिकांचे नेमके काय करायचे? याबाबत अंतिम टप्प्यात निर्णय घेण्यात येणार आहे. 

अशी आहे मतमोजणीची प्रक्रिया

नाशिक शिक्षक मतदारसंघातील एकूण ६९ हजार ३६८ मतदारांपैकी ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ९३.४८ टक्के मतदान झाले होते. यानंतर आता मतमोजणीवेळी सुरुवातीला ६४ हजार ८४८ मतांपैकी वैध मते ठरवली जाणार असून पहिल्या टप्प्यात ५० मतांचे गठ्ठे बांधले जाणार आहेत. त्यानंतर वैध-अवैध मतांची विभागणी होणार असून मतांचा कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार असून याप्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. यानंतर सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या