Wednesday, July 3, 2024
Homeनाशिकनाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी गोंधळ; शिवसेनेने घेतला आक्षेप

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी गोंधळ; शिवसेनेने घेतला आक्षेप

नाशिक | Nashik

- Advertisement -

विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) शिक्षक आणि पदवीधरच्या चार मतदारसंघासाठी २६ जून रोजी मतदान (Voting) झाले होते. त्यानंतर आज सकाळी आठ वाजेपासून या चारही ठिकाणच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात नाशिक शिक्षक मतदारसंघाचा देखील समावेश असून नाशिक शिक्षक मतदारसंघातील मतदानाची मतमोजणी शहरातील अंबड येथील वखार गोदामात सुरु आहे. ३० टेबलवर ही मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे १८० कर्मचारी मतमोजणी करत आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Teacher Constituency Election) ९३.४८ टक्के मतदान झाले असून एकूण ६४ हजार ८४८ शिक्षकांनी मतदान केले आहे. मात्र, या मतमोजणीच्या सुरुवातीलाच एका मतपेटीत तीन मतपत्रिका जास्त आढळल्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला आहे. त्यामुळे यावर शिवसेनेने (Shivsena) आक्षेप घेतल्याने मतमोजणीची प्रक्रिया काहीवेळ थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच चोपडा येथील (Chopda) २२ क्रमांकाच्या मतदान केंद्रात ९३५ मतदान झाल्याची नोंद आहे. मात्र, याठिकाणी पेटीमध्ये ९३८ मतपत्रिका आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या मतपत्रिकांची चौकशी करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आल्याचे समजते.

अशी आहे मतमोजणीची प्रक्रिया

नाशिक शिक्षक मतदारसंघातील एकूण ६९ हजार ३६८ मतदारांपैकी ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ९३.४८ टक्के मतदान झाले होते. यानंतर आता मतमोजणीवेळी सुरुवातीला ६४ हजार ८४८ मतांपैकी वैध मते ठरवली जाणार असून पहिल्या टप्प्यात ५० मतांचे गठ्ठे बांधले जाणार आहेत. त्यानंतर वैध-अवैध मतांची विभागणी होणार असून मतांचा कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार असून याप्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. यानंतर सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या