Wednesday, July 3, 2024
Homeनगरनाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : राहाता येथील केंद्रावर मतदानासाठी रांगाच रांगा!

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : राहाता येथील केंद्रावर मतदानासाठी रांगाच रांगा!

राहाता । तालुका प्रतिनिधी

- Advertisement -

प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली असून विभागातील ९० केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडत आहे. एकूण ६९ हजार ३६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teacher Constituency Election ) निवडणुकीत यंदा २१ उमेदवार रिंगणात असून आज या सर्व उमेदवारांच्या भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. 

दरम्यान राहाता तालुक्यातील मतदान केंद्राची अवस्था ‘मतदार जास्त अन मतदान केंद्र कमी’ या स्थितीमुळे शिक्षक मतदारांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. त्यामुळे तीन ते चार तास ताटकळत उभे राहावे लागले. राहाता तालुक्यात दोन मतदान केंद्र आणि २१५८ मतदार आहेत. मतदान केंद्रावर रांगाच्या रांगा दिसून आल्या. त्यामुळे अजून एक मतदान केंद्राची गरज होती, अशी भावना मतदारांनी व्यक्त केली.

राहाता तहसील कार्यालयात सकाळी ७ वाजता प्रत्यक्षात मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीला मतदान केंद्रावर गर्दी कमी होती. बहुतांशी शाळा सकाळी ११ वाजेपर्यंत असल्याने ११ वाजेनंतर दोन्ही मतदान केंद्रावर रांगा दिसून आल्या. मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदान (Voting) सुरु झाल्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत ८ टक्के इतके मतदान झाले होते. तर सकाळी अकरा वाजेपर्यंत २३.१६ टक्के मतदान झाले होते. त्यात नंदुरबार २६.३५, धुळे २६.६५, जळगाव २०.०५ नाशिक २५.२२ आणि नगरमध्ये १९.९१ टक्के मतदान झाले होते.

त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत नाशिक शिक्षक मतदारसंघात ४३.४७ टक्के मतदान झाले आहे. यात नाशिक ४५.४४ नंदुरबार ५०.७७, धुळे ४७.२५, जळगाव ४०.७५ आणि नगरमध्ये ३८.६४ टक्के मतदान झाले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातील ६९ हजार ३६८ मतदारांपैकी दुपारी एक वाजेपर्यंत ३० हजार १५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

सर्वाधिक मतदार नाशिक जिल्ह्यातील

नाशिक विभागातील एकूण ९० केंद्रांवर मतदान होत आहे. यात नाशिक जिल्ह्यातील २९, अहमदनगर २०, जळगाव २०, धुळे १२ आणि नंदुरबार जिल्ह्यातील नऊ केंद्रांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण ६९ हजार ३६८ मतदारांची नोंदणी झाली आहे. यात सर्वाधिक २५ हजार ३०२ मतदार नाशिक जिल्ह्यातील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या