अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज (बुधवार, दि. 26) मतदान होत आहे. या मतदारसंघात उमेदवारांची संख्या 21 झाल्याने चांगलीच चुरस वाढली आहे. मतदारांच्या सोईसाठी जिल्ह्यात 20 मतदान केंद्रे केली आहेत. एकूण उमेदवारांपैकी 9 उमेदवार नगर जिल्ह्यातील असल्याने निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढली आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातून दि.25 रोजी मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक, डीएड., बीएड, आयटीआय अशा विविध व्यावसायिक शिक्षण देणार्या संस्थांमधील शिक्षकांसाठी हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात नाशिक विभागात 69 हजार 368 मतदार असून नाशिक आणि नगर जिल्ह्यात मतदारांची संख्या अधिक आहे.
नाशिक जिल्ह्यात 25 हजार 302 मतदार असून, त्याखालोखाल नगर जिल्ह्यात 17 हजार 392 मतदार आहेत. जळगाव जिल्ह्यात 13 हजार 122, धुळे जिल्ह्यात 8 हजार 159, तर नंदुरबार जिल्ह्यात 5 हजार 393 मतदार आहेत. ही निवडणूक मतदान पत्रिकेवर घेतली जाते. मतदारांना एक ते 21 पसंती क्रमांक लिहून उमेदवार निवडीचा अधिकार आहे. मात्र, एक क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे. एक क्रमांक लिहिलेला नसल्यास मतपत्रिका बाद धरली जाते. मतदार एक क्रमांक लिहून अन्य उमेदवारांना पसंती क्रमांक लिहिणे ऐच्छीक आहे. मतदान प्रक्रियेसाठी जादा वेळ लागू नये, यासाठी दोन कम्पार्टमेंट राहणार आहेत. एकाच वेळेस दोघांना स्वतंत्रपणे मतदान करता येणार आहे. मतदानपेटी एकच राहणार आहे.
मतदान केंद्र तहसील कार्यालय (अकोले), मातोश्री रुक्मिणीबाई दामोधर मालपाणी (शारदा शिक्षण मंदिर) खोली क्रमांक एक, दोन आणि तीन (संगमनेर तालुका), राहाता तहसीलदारांचे दालन आणि पुरवठा विभाग (राहाता), कोपरगाव न्यायालयीन कामकाज खोली, तहसील कार्यालय आणि तहसीलदारांचे दालन (कोपरगाव), श्रीरामपूर नवीन मराठी शाळा (श्रीरामपूर), जिल्हा परिषद शाळा, नेवासे खुर्द (नेवासे), शेवगाव तहसीलदारांचे दालन (शेवगाव), पाथर्डी तहसीलदारांचे दालन (पाथर्डी), राहुरी जुने सेतू कार्यालय, तहसील कार्यालय (राहुरी), पारनेर तहसील कार्यालय, मीटिंग हॉल (पारनेर), रेसिडेन्शिअल विद्यालय, खोली क्रमांक 107, 108 आणि 109 अहमदनगर, (नगर शहर आणि तालुका), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले) श्रीगोंदे (श्रीगोंदे), कर्जत तहसील कार्यालय, मीटिंग हॉल (कर्जत), जामखेड तहसील कार्यालय, मीटिंग हॉल (जामखेड).
सरमिसळ करून होणार मोजणी
सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान नोंदवावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर यांनी केले आहे. तसेच या निवडणूकीत सर्व मतदान केंद्रांतील मतपत्रिकांची सरमिसळ करुन मतमोजणी केली जाते. त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रात कोणत्या उमेदवारास किती मते मिळाली, असा तपशिल तयार केला जात नाही. मतदारांनी मोठया संख्येने निर्भयपणे मतदान करावे, असेही सागर यांनी केले आहे.