Saturday, June 29, 2024
Homeनगरशिक्षक आमदारकीसाठी जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान

शिक्षक आमदारकीसाठी जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान

नाशिक विभागात 93.48 टक्के मतदान || नेवासा केंद्रावर सायंकाळी सहानंतरही रांगा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी काल (बुधवारी) मतदान पार पडले. नाशिक विभागात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 93.48 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी मतदानासाठी सायंकाळी सहानंतरही रांगा असल्याने मतदानाच्या आकडेवारीत वाढ होणार आहे. नगर जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सायंकाळी सहापर्यंत 93.88 टक्के मतदान झाले. एकूण 17 हजार 392 मतदारांपैकी 16 हजार 327 मतदारांनी मतदान केले. नेवासा येथील मतदान केंद्रावर सहानंतरही रांगा असल्याने मतदानाच्या आकडेवारीत वाढ होणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 21 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी नगर जिल्ह्यातील 9 उमेदवार होते. मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत होती. जिल्ह्यातील 20 मतदान केंद्रांवर किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले, मात्र काही ठिकाणी शिक्षक मतदारांना पावसात भिजत मतदान करावे लागले. सकाळी 11 पर्यंत मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी होती. निवडणुकीमुळे

शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या गेल्या होत्या. 11.30 च्या सुमारास शाळा सुटल्यानंतर मतदान केंद्रांवर मोठी गर्दी होऊन रांगा लागल्या. नेवासा येथील मतदान केंद्रावर सायंकाळी एका शिक्षकाने पोलिसांबरोबर गेटवरच अरे-तुरेची भाषा वापरून हुज्जत घातली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. श्रीरामपूर येथे दुपारी आलेल्या पावसामुळे मतदान प्रक्रीयेत थोडा खंड पडला. परंतू पाऊस उघडल्यानंतर पुन्हा मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झालेली दिसली. कोपरगाव शहरातील मतदान केंद्रावर आमदार आशुतोष काळे, आमदार नरेंद्र दराडे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे कार्यकारी संचालक अमित कोल्हे आदी बूथ वर बसून होते. राहुरी येथील मतदान केंद्रावर शिक्षक मतदारांनी भरपावसात आपल्या मतदानाचा हक्क बजविला. मतदारांच्या झालेल्या गैरसोयीमुळे काही काळ मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता.

जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांपैकी बहुतांशी नाशिक शहरातील मतदान केंद्रावर ठाण मांडून बसले होते. एकमेव उमेदवार आप्पासाहेब शिंदे नगर शहरातील मतदान केंद्रावर उपस्थित होते. एकूण 11 हजार 862 पुरूष मतदारांपैकी 11 हजार 189 (94.33 टक्के) तर 5 हजार 530 महिला मतदारांपैकी 5 हजार 138 (92.81 टक्के) मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, मतदानानंतर जिल्ह्यातील सर्व मतपेट्या राहाता येथे संकलित करून त्या रात्रीच नाशिककडे रवाना केल्या जाणार होत्या. नाशिकमधील अंबड एमआयडीसीच्या गोदामात दि. 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिक विभागात नंदूरबार जिल्ह्यात 96.12टक्के, धुळे 93.77, जळगाव 95.26, नाशिक 91.63, अहमदनगर 93.88 असे एकूण 93.48 टक्के मतदान झाले.

अकोले, कर्जतमध्ये शिक्षकांची फर्स्ट क्लास कामगिरी
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे अकोले (96.13), संगमनेरमधील तीन केंद्रांवर अनुक्रमे (97.55), (97.43) व (91.18), राहत्यातील दोन केंद्रांवर (95.33) व (92.26), कोपरगावमधील दोन केंद्रावर (95.47) व (91.53), श्रीरामपूर (95.43), नेवासा (92.42), शेवगाव (92.24), पाथर्डी (93.82), राहुरी (92.46), पारनेर (95.83), नगर ग्रामीणमधील दोन केंद्रावर अनुक्रमे (94.30) व (90.02), नगर शहर (91.30), श्रीगोंदा (92.55) कर्जत (96.85) व जामखेड (95.82) टक्के.

- Advertisment -

ताज्या बातम्या