नाशिक | Nashik
महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील महादेवाच्या मंदिरांसोबत विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशातच नाशिकमधील त्रंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमावरुन मात्र वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यातच त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठीतील सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार येथे शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला आता माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात त्यांनी देवस्थानला पत्र लिहिले असून चुकीचा पायंडा न पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशातच, आता पुरातत्व विभागाने आक्षेप व्यक्त केल्यामुळे एकंदरीतच कार्यक्रम रद्द होणार की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या शिवार्पणनस्तु नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र प्राजक्ता माळीच्या या कार्यक्रमाला मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध केला असून ग्रामीण पोलिसांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यापूर्वी सेलिब्रिटी इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, असे ललिता शिंदेंनी पत्रात म्हटले आहे. तसेच या पत्रामध्ये ललिता यांनी प्राजक्ता माळी वादग्रस्त व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या नृत्याविष्कार कार्यक्रमाला विरोध असल्याचेही म्हटले आहे. या माध्यमातून चुकीचा पायंडा पाडू नये अशी ललिता शिंदे यांची मागणी असल्याचे पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, असेही ललिता शिंदे यांनी म्हटले आहे.
प्राजक्ता माळी काय म्हणाली?
या बाबत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने व्हिडीओ पोस्ट करत म्हंटले आहे की, मला त्र्यंबकेश्वर ट्रस्टकडून फोन आला होता, की आम्ही महाशिवरात्री निमित्त शास्त्रिय, उपशास्त्रिय संगितावर कार्यक्रम आयोजित करत असतो. आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकार येथे आपली कला सादर करुन गेले आहे. फुलवंतीच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला कळले की तुम्ही भरतनाट्यम नर्तिका आहात तर यंदाच्या वर्षी तुम्ही तुमचे शास्त्रिय नृत्याचा कार्यक्रम येथे सादर कराल का? अर्थात सगळ्या नृत्य कर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे. त्यामुळे वेळ न दवडता होकार कळवला. मी ईथे आवर्जून नमुद करु इच्छिते की महाशिवरात्री निमित्त होणारा हा कार्यक्रम संपुर्ण शास्त्रिय असून मी भरतनाट्यम विशारद आहे, अपुऱ्या माहितीमुळे कोणाचा गैरसमज झाला असेल, तर त्यांनी त्यांच्या मनातील किंतु परंतू काढून टाकावे आणि समाजाची दिशाभुल करु नये अशी मी विनंती करते. आणि एक गोष्ट आवर्जून नमुद करु इच्छिते की देवाच्या दारात कोणीही सेलिब्रिटी नसते, सगळे भक्त असतात, आणि त्याच भक्तिभावाने माझ्या नृत्याच्या भावातून माझी सेवा नटराजाच्या चरणी अर्पण करणार आहे आणि म्हणूनच कार्यक्रमाचे नाव शिवार्पणमस्तू असे आहे. वेळेच्या अभावी मी दोनच रचना सादर करणार असून बाकी माझे सहकलाकार सादर करणार असून बाकी कार्यक्रमाचे मी निवेदन सादर करणार आहे. अर्थातच गर्दी आणि चेंगराचेंगरीची भिती असेल तर विश्वस्त आणि पोलिस जो काही निर्णय घेतली तो सामाजिक भान बाळगत सगळ्यांवरच बंधनकारक असणार आहे आणि तो सगळ्यांना मान्य असणार आहे पण कार्यक्रमाच स्वरुप शास्रनृत्याच असणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा