त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे शनिवार (दि.२०) रोजी आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांना येथील प्रवाशी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली होती. यात किरण ताजणे (पुढारी न्यूज), येमेश खरे (झी २४ तास), अभिजित सोनवणे (साम टीव्ही) हे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होत असून, दोषींवर कठोर कारवाई (Action) करण्याची मागणी केली जात होती.
त्यानंतर या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) प्रशांत राजू सोनवणे, शिवराज धनराज आहेर, ऋषिकेश योगेश गांगुर्डे या तिघांना अटक (Arrested) केली. तर इतरांचा शोध सुरु आहे. या मारहाण प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर आता त्र्यंबक नगरपरिषदेने वाहन फी वसुली करणाऱ्या ठेकेदाराला मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत नगरपरिषदेने एक परिपत्रक देखील काढले आहे.
दरम्यान, त्र्यंबक नगरपरिषदेकडून (Trimbakeshwar NMC) शहरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून वाहन फी वसुली केली जात असून, हे वसुलीचे काम एएस मल्टी सर्व्हिसेस, खारघर नवी मुंबई या कंपनीला दिले आहे. १ कोटी ८ लाख रुपयांचा हा वार्षिक ठेका असून, अनिल शुक्ला असे ठेकेदाराचे नाव आहे. त्यांच्याकडे नगरपरिषदेचा सफाई, पाणीपुरवठा आणि पार्किंग वसुलीचा ठेका असून, त्यांनी दोन अधिका-यांकडे हा चालवायला दिला आहे. या अधिकार्यांनी वसुलीसाठी काही मुले नेमली असून, ही मुले वाहन प्रवेश फीची वसूली करताना प्रचंड उर्मट वागत असल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. याच मुलांनी पत्रकारांना (journalists) मारहाण केली आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्र. १ अन्वये आपणांस त्रिंबक नगर परिषद हद्दीतील वाहन प्रवेश फी वसुली करणेचे काम दि. ११/०३/२०२५ ते दि.१०/०३/२०२६ या कालावधीकरीता संदर्भ क्र. २ अन्वये करारनाम्यानुसार देण्यात आलेले होते. परंतु दि. २०/०९/२०२५ रोजी त्रिंबक नगर परिषद हद्दित प्रवेश करताना आपल्या कर्मचारी यांच्याकडून काही पत्रकारांना मारहाण करण्यात आलेली असून, सदर घटनेमुळे त्रिंबक नगर परिषदेची प्रतिमा सर्वत्र मलिन झालेली आहे. ही सदर बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची व गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. सदर घटना घडली त्याठिकाणी आपल्या करारनाम्यातील अट क्र.५ नुसार आपल्या कामाबाबतचे तसेच वसुली दराचे कुठलेही बोर्ड दिसून आलेले नाहीत, तसेच सदर घटनेमुळे आपल्याकडून करारनाम्यातील अट क्र.३ व करारनाम्यातील अट क्र.८ चा भंग झालेला आहे. तरी आपला कामाचा मक्ता का काढून घेण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा ४८ तासांच्या आत इकडील कार्यालयात समक्ष सादर करण्यात यावा. अन्यथा आपले काही एक म्हणणे नाही असे समजून सदर मक्ता रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे नगरपरिषदेने पत्रात म्हटले आहे.




