नाशिक | Nashik
गेल्या आठ दिवसांपासून नाशिकच्या (Nashik) राजकीय वर्तुळात चर्चेत असणाऱ्या हायव्होल्टेज ‘पॉलिटिकल ड्रामा’वर अखेर आज पडदा पडला आहे. भाजप नेते गणेश गिते (Ganesh Gite) यांचे बंधू अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा प्रचार थांबवत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तर मंत्री गिरीश महाजन यांनी गोकुळ गिते विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत म्हणून नरेंद्र दराडे हेच असणार आहे.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे, आमदार सुहास कांदे, माजी नगरसेवक गणेश गिते, उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना नेते अजय बोरस्ते यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. गोकुळ गिते यांनी आपले बंधू गणेश गिते यांच्यासह काल (बुधवारी) मुंबईत मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांची भेट घेतली होती. या भेटीत गिते यांच्याशी नाशिक विधानपरिषद निवडणुकीत संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर गोकुळ गिते यांनी आज (गुरुवारी) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा प्रचार थांबवत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, नाशिक विधान परीषद निवडणुकीत गोकुळ गिते यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ते कोणत्या बाजूने झुकतात यावर निवडणुकीचे (Election) गणित बदलण्याची शक्यता होती. गेल्या काही दिवसांत भाजप आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. अखेर या प्रयत्नांना आज यश आल्याचे बघायला मिळाले.
दराडे दुसर्यांदा विधानपरिषदेत पोहोचणार
गोकुळ गिते यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केल्याने महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दुसर्यांदा विधानपरिषदेत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांचे बंधु किशेार दराडे यांनी देखील शिक्षक मतदारसंघात गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत बाजी मारली होती. यानंतर आता नरेंद्र दराडे हे देखील दुसर्यांदा विधानपरिषदेत जाणार असून, एका कुटुंबातून सलग दोनदा आमदार होण्याच्या घटना बघायला मिळणार आहे.




