Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Vidhan Parishad Election : "दराडे निष्क्रिय, आठ दिवसांपासून प्रलोभने, भावाचा आणि...

Nashik Vidhan Parishad Election : “दराडे निष्क्रिय, आठ दिवसांपासून प्रलोभने, भावाचा आणि मंत्र्यांचा…”; गोकुळ गिते मनातील सगळंच बोलले, नेमकं काय म्हणाले?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) रणधुमाळीत महायुतीमधील (Mahayuti) बंडखोरीचे नाट्य अधिकच रंजक आणि तीव्र झाले आहे. भाजपचे माजी स्थायी सभापती गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (शिवसेना शिंदे गट) यांच्यापुढे अजूनही पेच आहे. गोकुळ गिते यांनी दराडे यांना पाठिंबा द्यावा, यासाठी महायुतीकडून दोन-दोन मंत्री प्रयत्न करत आहेत. मात्र,गिते आपल्या निर्णयावर ठाम असून, त्यांनी महायुतीला थेट आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) गोकुळ गिते यांनी माध्यमांशी संवाद साधला असता नरेंद्र दराडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत निवडणुकीत कोणतीही तडजोड करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, ” नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्याविरोधात मतदार आहेत. मागच्या सहा वर्षांत त्यांनी कुठलेही काम केलेले नाही. इथले लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्यामुळे मतदारच (Voter) मला निवडणूक लढण्यासाठी सांगत आहेत. नेत्यांचा मान राखण्यासाठी मी फार तर निवडणुकीतून थांबू शकतो, घरात बसू शकतो, पण दराडे यांना अजिबात पाठिंबा देऊ शकत नाही”, असेही गोकुळ गिते यांनी स्पष्ट केले. तसेच आधी तोंडसुख घ्यायचे, सोशल मीडियावर माझ्या सात पिढ्यांचा उद्धार करायचे आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची ही कोणती संस्कृती? असा सवाल उपस्थित करत त्यांनी दराडे कुटुंबावर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असल्याने उपमुख्यमंत्री शिंदेंची घेणार भेट

गोकुळ गिते आज (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची मुंबईत (Mumbai) भेट घेणार होते. मात्र, मुख्यमंत्री दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.त्यासाठी गोकुळ गिते मुंबईला रवाना झाले आहेत. तसेच जर मला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाण्यास सांगितले, तर तिथे जाणेही क्रमप्राप्त आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आठ दिवसांपासून प्रलोभने, पण मी भीक घेणार नाही

माध्यमांशी बोलताना गोकुळ गीते यांनी निवडणुकीतील घोडेबाजारावर तीव्र आक्षेप घेत खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की, “गेल्या आठ दिवसांपासून मला थांबवण्यासाठी विविध मध्यस्थांमार्फत प्रलोभने दिली जात आहेत. पण मला ते नको आहे, मी भीक घेणार नाही,” असा थेट आरोप गोकुळ गिते यांनी केला.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गितेंचे बंड थंड होणार? दराडे बंधूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, काय ठरलं?

भावाचा आणि मंत्र्यांचा दबाव, पण माघार नाही!

गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते हे भाजपमध्ये सक्रिय असून त्यांचे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी जवळचे संबंध आहेत. गणेश गिते यांनीही गोकुळ गिते यांना निवडणुकीतून मागे हटण्याचा सल्ला दिला आहे. यावर बोलताना गोकुळ गिते म्हणाले, “माझे आणि गिरीश महाजन यांचे फारसे संबंध नाहीत, पण माझे बंधू गणेश गीते यांचे महाजन यांच्याशी जवळचे संबंध आहेत. गणेश गीते मला थांबायला सांगत आहेत. मी स्वतः भाजपमध्ये सक्रिय नाही, पण बंधूंमुळे मी काम करत होतो,असे त्यांनी म्हटले.

माझ्या कामाचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा झाला

स्वतःच्या राजकीय स्थानाबद्दल बोलताना गोकुळ गिते यांनी स्पष्ट केले की, “त्यांच्याकडे भाजपचे कोणतेही अधिकृत पद नाही. माझे बंधू गणेश भाऊ २०१७ पासून भाजपचे पदाधिकारी आहेत, ते स्थायी समिती सदस्यही होते. मी नेहमी पडद्यामागे राहून काम करायचो आणि माझ्या या कामांमुळे अप्रत्यक्षपणे भाजपलाच फायदा झाला आहे, असे सांगत त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडून येणाऱ्या दबावाला झुकणार नसल्याचे संकेत दिले.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...