Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Vidhan Parishad Election : 'शिंदेंचा शब्द' की भाजपचे संख्याबळ? महायुतीत संघर्षाची...

Nashik Vidhan Parishad Election : ‘शिंदेंचा शब्द’ की भाजपचे संख्याबळ? महायुतीत संघर्षाची ठिणगी, अपक्षाचा ‘प्लॅन बी’ तयार?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत (Local Body Election) नाशिकची (Nashik) जागा महायुतीमध्ये (Mahayuti) कमालीची प्रतिष्ठेची बनली आहे. या जागेवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही प्रमुख मित्रपक्षांनी जोरदार दावा ठोकल्याने महायुतीतील अंतर्गत संघर्ष कमालीचा चिघळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका नेत्याला ‘शब्द’ दिल्यामुळे शिवसेनेने या जागेवरून मागे न हटण्याचा पवित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे भाजपनेही ‘अपक्ष’ उमेदवाराचा पर्याय खुला ठेवत शिंदेंना राजकीय शह देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisement -

प्रारंभी महायुतीत भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर लढणार अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेने (Shivsena) सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत ५ जागांची मागणी लावून धरली होती. नव्या सूत्रांनुसार हा फॉर्म्युला ११-४-२ असा बदलल्याचे समजते, ज्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला नाशिक, ठाणे, यवतमाळ आणि परभणी या जागा जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु, नाशिकच्या जागेवरून स्थानिक पातळीवर भाजप (BJP) आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : विधानपरिषदेसाठी २४ अर्जाची विक्री; तीन माजी आमदारांनी नेले अर्ज, निवडणुकीत चुरस वाढणार?

शिवसेनेचा दावा

मागील निवडणुकीत (Election) या मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले होते. ‘ज्याची जागा त्याची’ या न्यायानुसार ही जागा पुन्हा शिवसेनेलाच मिळावी, असा पक्षाचा ठाम आग्रह असून यामुळेच दराडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि भाऊसाहेब चौधरी यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपचा आक्षेप

जिल्ह्यात सध्या भाजपचे संख्याबळ (नगरसेवक) शिवसेनेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही जागा आपल्याच वाट्याला यावी यासाठी माजी नगरसेवक गणेश गिते, निलेश बोरा यांच्यासह स्थानिक भाजप नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर प्रचंड दबाव आणला आहे.

‘शिंदेंचा शब्द’ आणि मुंबईतील खलबते

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नाशिकमधील एका बड्या नेत्याने आणि भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, मी आधीच शब्द दिला असून तो आता मागे घेता येणार नाही, असे स्पष्ट शब्दात सुनावल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागांच्या तिढ्याबाबत मुंबईत वरिष्ठ पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे.

भाजपचा ‘अपक्ष’ पर्यायाचा इशारा?

महायुतीचे एकत्रित संख्याबळ पाहता विजय निश्चित मानला जात असला, तरी उमेदवारीवरून सुरू झालेली ही लढत अंतर्गत दुरावा वाढवणारी ठरू शकते. जर वरिष्ठ पातळीवरून ही जागा शिवसेनेला सोडली गेली, तर भाजप सहजासहजी माघार घेणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून अंतर्गत पाठिंबा देऊन एखादा तगडा ‘अपक्ष’ उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो. या ‘प्लॅन बी’मुळे एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि महायुतीमधील छुपी बंडखोरी उघड होण्याची शक्यता आहे.

‘राष्ट्रवादी’ची ‘वेट अँड वॉच’ भूमिका

या संपूर्ण वादात महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मर्यादित असली तरी त्यांची मते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाला साथ देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आता या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजप आणि शिवसेना यांच्यात समन्वयाचा कोणताही सुवर्णमध्य निघतो की, नाशिकच्या राजकारणात मित्रपक्षांमध्ये थेट संघर्ष पेटतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...