नाशिक | Nashik
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर थंडी (Cold) वाढली असून नागरिकांचे हातपाय गारठले आहेत. राज्यातील विविध भागांत ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात असून नागरिक स्वेटर कानटोप्या घालून बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा पारा देखील घसरला असून आज सोमवार (दि.१६) रोजी निफाड येथे ५.६ तर नाशिकमध्ये ९.०४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.
निफाडचा (Niphad) पारा घसरल्याने डिसेंबर अखेर तालुक्यातील द्राक्षबागायतदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. ऐन द्राक्षमाल फुगणवणीच्या काळात थंडीचा जोर वाढल्याने द्राक्षाच्या फुगवणीवर परिणाम होणार आहे. शिवाय या कडाक्याच्या थंडीमुळे परिपक्व झालेल्या द्राक्षमण्यांना तडे जाऊन नुकसानीचा धोका वाढला आहे. तर रविवार (दि .१५) रोजी निफाड येथे ६.१ आणि नाशिकमध्ये १०.६ अंश सेल्सियस इतके तापमान होते. तसेच मालेगावला १०.४, जळगाव येथे ७.९ आणि अहिल्यानगर येथे ६.४ अंशसेल्सियस इतके होते.
दरम्यान, वातावरणातील (Environment) बोचऱ्या वाऱ्यांमुळे दिवसाही थंडी जाणवत असून सायंकाळनंतर थंडीत वाढ होत आहे. यामुळे ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. या थंडीचा गहू, हरभरा या पिकांसाठी फायदेशीर आहे.