नाशिक : हातात चाकू घेतलेल्या चौघा संशयितांच्या टोळक्याने सीने स्टाईन पाठलाग करून एकाचा खून केल्याची घटना शनिवारी (दि.7) मध्यरात्रीच्या सुमारास जुने नाशिकच्या संभाजी चौक परिसरात घडली.
विवेक सुरेश शिंदे (23 रा. ट्रक्टर हाऊस, द्वारका) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शंभू गोरख जाधव, शिवा गोरख जाधव, सुशांत वाबळे व नाम्या (पुर्ण नाव समजू शकले नाही) या चौघांवर या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शंभु जाधव याने बहिणीशी प्रेमसबंध असल्याच्या कारणातून तसेच याच कारणावरून दोन गटात झालेल्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगीतले.
भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहितीनुसार द्वारका परिसरातील जय जलाराम सोसायटीत राहणारा विवेक सुरेश शिंदे हा त्याचा मित्र ओम राजेंद्र हादगेसोबत भीशीची रक्कम गोळा करण्यासाठी शनिवारी सायंकाळी घराबाहेर पडला होता. रात्री जुने नाशिकमार्गे दुचाकीवरुन घरी परतत असताना या दोघांना संशयित हल्लेखोर शंभू जाधव व सुशांत वाबळे व त्यांच्या अन्य तीन साथीदारांनी अडविले. त्यांच्या हेतु ओळखून विवेक व ओम यांनी पळ काढला यावेळी ओम त्यांच्या तावडीतून निसटण्यास यशस्वी ठरला; मात्र सुशांत व शंभू याने विवेकला एकटे गाठून संभाजी चौकातून पुढे मनपा उर्दू शाळेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नेऊन धारधार शस्त्राने सपासप पोटावर वार करत पळ काढला.
त्यास भाऊ रोहन शिंदेने प्रथम खासगी तर नंतर जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषीत केले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजनकुमार सोनवणे हे करीत आहेत. गुन्ह्यातील संशयित शंभू गोरख जाधव, शिवा गोरख जाधव, सुशांत वाबळे, नाम्या हे संशयित फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चार पथके पाठवण्यात आली आहेत. लवकरच सर्व हल्लेखोरांना अटक करण्यात येईल असा विश्वास उपायुक्त अमोल तांबे यांनी व्यक्त केला आहे.
याच कारणातून टाक खून
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2016 साली टकलेनगर भागात रोहन टाक या युवकाचा गावठी कट्ट्यातून गोळी मारून खून झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातदेखील मुख्य संशयित म्हणून शंभू जाधव व सुशांत वाबळे यांचा सहभाग होता. यावेळीही आता खून झालेला विवेक शिंदे हाच लक्ष होता. मात्र मध्यस्थी करणारा टाकलाच गोळी लागली होती. तर विवेकने पळ काढल्याने वाचला होता. या गुन्ह्यात जेरबंद करण्यात आलेले संशयित हे जामीनावर तुरूंगाबाहेर आले असताना त्यांनी हा काटा काढला.
दोन्ही कुटुंबात समझोता
दोन वर्षांपुर्वी सबंधीत मुलगी व विवेक शिंदे यांचे केटीएचम महाविद्यालयात भांडण झाले होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलीसांत वाद गेल्यानंतर जाधव व शिंदे कुटुंबियांनी आपसात समझोता केल्याने या वादावर पडदा टाकण्यात आला होता. मात्र विवेक शिंदे बाबत शंभु व शिवा जाधव या भावंडाना प्रचंड राग होता. या रागातूनच हा खून झाल्याचे विवेक शिंदेच्या भावाने फिर्यादीत म्हटले आहे.