Wednesday, May 22, 2024
Homeनाशिकसाहित्य अकादमी युवा पुरस्कारावर ‘देवबाभळी’ची छाप

साहित्य अकादमी युवा पुरस्कारावर ‘देवबाभळी’ची छाप

नाशिक । प्रतिनिधी

साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणार्‍या साहित्य अकादमी युवा पुरस्काराचे (sahitya akademi youth award) मानकरी नाशिकचे मराठमोळे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) ठरले आहेत. त्यांच्या ‘देवबाभळी’ (Deobabhali) या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. प्राजक्त यांचे संगीत देवबाभळी हे नाटकही फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरले आहे….

- Advertisement -

दरवर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लेखकांना त्यांच्या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येतो. ताम्रपत्र तसेच 50,000 रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 2020 चा हा पुरस्कार प्राजक्त देशमुख यांना मिळाला आहे. मराठीसोबतच बंगाली साहित्यासाठीचे पुरस्कारही जाहीर करण्यात आले.

बंगाली लेखक श्याम बंडोपाध्याय (Sham Bandopadhyay Bengali writer) यांच्या पुराणपुरूष या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी तज्ज्ञांच्या त्रिसदस्यीय समितीने काम पाहिले. या समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Actor Dilip Prabhavalkar) यांचाही समावेश आहे. त्यांच्यासोबतच आशा बागे आणि लक्ष्मीकांत देशमुख या तज्ज्ञांनीही या पुरस्कारासाठी काम पाहिले.

प्राजक्त यांच्या देवबाभळी या पुस्तकाला आत्तापर्यंत 39 पुरस्कारांनी सन्मानित कऱण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारचा विजय तेंडुलकर पुरस्कारही प्राजक्त यांना मिळालेला आहे.

अत्यंत आनंदाचा दिवस आहे. खूपच वेगळी भावना आहे. नाटकासाठी म्हणून जे जे पुरस्कार असतात, ते सगळे देवबाभळीने दिले आहे आणि आता हा साहित्यातला सर्वोच्च म्हंटला जाईल, असा वेगळा पुरस्कार मिळाला आहे. एक आनंद असापण आहे की, गेली दोन वर्षे रंगभूमी बंद आहे. सगळं ठप्प आहे, निराशेचे वातावरण आहे. त्या दरम्यान एका नाट्यसंहितेला पुरस्कार मिळणे हा एक गौरव वाटतो. कारण वाड.्मय म्हणून जी साहित्य प्रकार मुख्य धारेमध्ये मानली जातात. कादंबरी, कथा संग्रह, त्या तुलनेत नाट्यसंहिता थोडी मागे पडते. वाचक त्याला तितकासा प्रतिसाद देत नाही. त्यातही काही चूक आहे अशातला भाग नाही. आणि नाटककार जेव्हा नाटके लिहितो ते कुठेतरी सादर व्हावे याच अनुषंगाने, तो कला प्रकार त्या अंगाने परावलंबी आहे. असे जरी असले तरीपण त्यात साहित्य आणि वाड.्मय मूल्य अधिक असते. हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. माझ्यासारखी मंडळी थोर नाटकांची नाटके वाचून मोठी झाली आहे. त्या निमित्ताने जे घडत आहे ते खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून एक साहित्य प्रकार म्हणून याच्याकडे बघितले जाईल आणि अधोरेखित होईल. आता फक्त लवकरच पुन्हा रंगभूमीवर हा आनंद साजरा करायला जास्त आवडेल आणि मिळालेला हा पुरस्कार माझा देवबाभळी आणि भद्रकाली परिवाराच्या संपूर्ण टीमचा आहे.

प्राजक्त देशमुख

- Advertisment -

ताज्या बातम्या