नाशिक । प्रतिनिधी Nashik
आठवडाभरापासून प्रतीक्षा लागलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१३ ) सकाळी ११.३० वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान नाशिक शहरातील कुंभमेळा कामांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होईल. मात्र, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत आचारसंहिता लागू असल्याने तेथील कामे वगळण्यात आली आहेत. फक्त नाशिक शहरातील कामांचेच भूमिपूजन होईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषदेची नवीन इमारत महापालिका हद्दीत असली तरी आचारसंहितेचा अडथळा येणार नाही, याची खातरजमा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून झाली आहे. याबाबत रविवारी (दि.९) अधिकृत तारीख प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने निमंत्रणे वाटपाला सुरुवात केली आहे. सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सदस्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोहळ्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनासाठी फक्त २० मिनिटांचा वेळ दिला असल्याने प्रशासनाने कार्यक्रमाची वेळ आखणी काटेकोरपणे केली आहे. नवीन इमारतीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला गती मिळणार असून, नागरिकांना सुविधा वाढणार आहेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




