नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांचे जातनिहाय आरक्षण (Caste Reservation) सोमवारी (दि. १३) जाहीर झाले असून, यंदाच्या आरक्षणात नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) अनेक प्रमुख इच्छुकांची मोठी निराशा झाली आहे. तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गटांपैकी ३ गट राखीव झाल्याने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा (Candidate) हिरमोड झाला आहे.
गिरणारे, गोवर्धन हे २ गट आदिवासींसाठी तर एकलहरे हा अनुसूचित जाती महिलेसाठी (Woman) राखीव झाला आहे. गोवर्धन गट हा सलग दुसऱ्यांदा आदिवासींसाठी राखीव झाला. यावेळी महिलेला संधी मिळणार आहे. केवळ पळसे गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामप्र) साठी राखीव झाला आहे.
पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) ८ गणातील सय्यदपिंप्री, लहवित हे दोन्ही खुले झाले आहेत. पळसे आणि विल्होळी (महिला) गण नामप्रसाठी राखीव झाले असून, एकलहरे गण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाला आहे. विशेष म्हणजे गिरणारे, देवगांव हे दोन्ही गण अनुसुचीत जमाती महिलेसाठी तर गोवर्धन गण अनुसूचित जमातीसाठी खुला झाला आहे.
गोवर्धन गट आदिवासी राखीव होता. यंदाही आदिवासींसाठी (महिला) राखीव झाला आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर हे निवडून आले होते. परंतु, इगतपुरी तालुक्यातून (Igatpuri Taluka) ते विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांनी राजीनामा दिला. अन् पोटनिवडणुकीत तेथून शिवसेनेचे राज चारोस्कर निवडून आले होते. गोवर्धन गण आदिवासीसाठी खुला होता. आता महिला राखीव झाला आहे. राष्ट्रवादीचेच (NCP) ढवळू फसाळे निवडून आले होते. तर विल्होळी गण हा खुला होता. येथून राष्ट्रवादीचे रत्नाकर चुंभळे यांनी बाजी मारली होती.
गिरणारे गटातून गतवेळी आदिवासी महिलेसाठी राखीव होता. येथून राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या सुनबाई अपर्णा खोसकर या निवडून येऊन पुढे जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापतीही झाल्या होत्या. यावेळीही हा गट आदिवासीकरिता खुला झाला आहे. यात गिरणारे अन् देवरगाव हे दोन गणांचा समावेश असून, गिरणारे गण हा गतवेळप्रमाणाचे तर देवरगाव गणही आदिवासी महिलेसाठीच राखीव आहे.
पळसे गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून तेवढाच काय तो दिलासा इतर प्रवर्गाला मिळाला आहे. त्यामुळे येथेच इच्छुकांची झुंबड उडणार असून इतर गटांमधील उमेदवारही येथूनच आपले नशीब अजमावणार आहेत. गतवेळी येथून राष्ट्रवादीचे यशवंत ढिकले निवडून आले होते. या गटात पळसे अन् सय्यद पिंप्री हे २ गण आहेत. पळसे गण गतवेळी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता. शिवसेनेच्या उज्वला जाधव यांनी बाजी मारली होती. यावेळी तो नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. तर सय्यद पिंप्री गण गतवेळी खुला होता. यंदाही तो खुला झाला आहे.
गतवेळी तेथून राष्ट्रवादीच्या (NCP) विजया कांडेकर या निवडून आल्या होत्या. त्या पंचायत समिती सभापती झाल्या होत्या. एकलहरे गटातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. गेल्यावेळी हा गट सर्वासाधारण होता. येथून अपक्ष यशवंत ढिकले निवडूण आले होते. यंदा मात्र लोकसंख्येनुसार जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची अनुसूचित जातीची (एस.सी.) लोकसंख्या असल्याने तो अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. तर एकहलरे गण हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. गतवेळी तो सर्वसाधारण प्रवर्गासाठी होता. लहवित गट खुला (सर्वसाधारण) झाला आहे. गतवेळी तो अनुसूचित जातीसाठी राखीव होता. येथून शिवसेनेने बाजी मारली होती.




