त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी |
तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी गट आणि गणांची आरक्षण (Gat and Gat) सोडत काढण्यात आली. तालुक्यातील एकूण ६ पैकी तीन गण महिलांसाठी आणि तीन पुरुषांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.
त्र्यंबकेश्वर पंचायत समिती (Trimbakeshwar Panchyat Samiti) अंतर्गत येणाऱ्या ठाणापाडा, देवगाव आणि हरसूल हे गण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. तर वाघेरा, ओझरखेड आणि अंजनेरी हे गण पुरुषांसाठी आरक्षित झाले आहेत. यातील वाघेरा व ओझरखेड हे दोन गट अनुसूचित जमाती पुरुष आणि अंजनेरी गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.
तसेच जिल्हा परिषद गटातील (Zilla Parishad Gat) ठाणापाडा हा गट अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. तर हरसूल आणि अंजनेरी हे गट अनुसूचित जमाती पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.
दरम्यान, यंदापासून नव्याने २०११ च्या लोकसंख्येवर आधारित काढण्यात येणारे पहिले आरक्षण काढले जात आहे. त्यामुळे नव्याने निघणाऱ्या आरक्षणामुळे आपला गट, गण आरक्षित होणार की, खुला राहणार या धास्तीने जिल्ह्यातील इच्छुकांची धडधड वाढली आहे.




