नाशिक | प्रतिनिधी Nashik
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या (Zilla Parishad and Panchyat Samiti) सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट-गण रचनेचा अंतिम आराखडा शुक्रवारी (दि. २२) विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम (Praveen Gedam) यांनी शासन राजपत्रात प्रसिद्ध केला. मालेगाव, नाशिक, सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या पाच तालुक्यांतील गट-गणात किरकोळ बदल झाले असून, उर्वरित दहा तालुक्यांतील रचना जैसे थे राहिली आहे.अंतिम रचनेमुळे आगामी निवडणुकीसाठी गट-गणांची आता निश्चिती झाला असून, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या (Candidate) तयारीला आता वेग येणार आहे.
प्रारूप आराखड्यावर जिल्ह्यातून एकूण ६४ हरकती प्राप्त झाल्या होत्या. यात निफाड तालुक्यात सर्वाधिक १८, नाशिक १४, मालेगाव १२, चांदवड ४, देवळा ३, नांदगाव आणि सिन्नरला प्रत्येकी २, तर त्र्यंबकेश्वर, येवला, पेठ, सुरगाणा आणि कळवण येथे प्रत्येकी एक हरकत नोंदवली गेली. इगतपुरी, दिंडोरी आणि बागलाणमधून कोणतीही हरकत आली नव्हती.११ ऑगस्टपर्यंत झालेल्या सुनावणीत ४२ हरकती फेटाळल्या गेल्या, ५ हरकती पूर्णपणे मान्य झाल्या, तर १७ अंशतः मान्य झाल्या.
मालेगावातील (Malegaon) खाकुर्डी, झोडगे, कळवाडी, साकुरी, दाभाडी आणि रावळगाव गट-गणांमध्ये बदल झाले असून, काही गावे इतर गटांना जोडली गेली. नाशिक तालुक्यातील ८ हरकती अंशतः मान्य झाल्याने चारही गट-गणांमध्ये बदल झाले आहेत. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ तालुक्यांतील सीमा निश्चितीच्या हरकती मान्य झाल्याने काही गावे जवळच्या गटांत समाविष्ट झाली, त्यामुळे गावांची संख्या कमी-जास्त झाली.चांदवड, निफाड, येवला, नांदगाव, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, देवळा आणि कळवण तालुक्यांतील (Kalwan Taluka) हरकती अमान्य झाल्याने तेथील गट-गण रचनेत बदल झाले नाहीत.




