Friday, January 23, 2026
HomeराजकीयNashik ZP Politics : जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आरक्षणानंतर अनेकांचे...

Nashik ZP Politics : जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आरक्षणानंतर अनेकांचे राजकीय समीकरणे बदलली

महिलांना मिळणार संधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेच्या गट गणांचे आरक्षण (Zilla Parishad Gat Reservation) सोमवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अनेक माजी अध्यक्ष, सभापती आणि विद्यमान सदस्यांचे गट राखीव झाल्याने त्यांची संधी हुकली आहे. त्यामुळे अनेकांना घरातील महिलांना निवडणूक (Election) रिंगणात उतरवावे लागणार आहे.त्यामुळे राजकारणात महिलांची संख्या वाढणार आहे.काहींना पंचायत समिती गणात लढून सभापतीच्या मार्गाने जिल्हा परिषदेची पायरी चढावी लागणार आहे.

- Advertisement -

जिल्हयावर राजकीयदृष्ट्या वर्चस्व गाजविणा-या निफाड तालुक्यातून (Niphad Taluka) माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, डी. के. जगताप, सिध्दार्थ वनारसे, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गिते, दीपक शिरसाठ, जयदत्त होळकर, सानिया होळकर, खंडू बोडके, डॉ. डेरले, संदीप गडाख, शिवा सुरासे, केशव जाधव यांना यांचे गट महिला व इतर प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांची जिल्हा परिषदेत येण्याची संधी हुकली आहे. ही संधी हुकल्याने बाळासाहेब क्षीरसागर यांच्या पत्नी मुक्ताताई क्षीरसागर, गोकुळ गिते यांची पत्नी उज्वला गिते, सिध्दार्थ वनारसे यांच्या पत्नी संगिता वनारसे, गौरव पानगव्हाणे यांच्या पत्नी डॉ. धनश्री पानगव्हाणे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

YouTube video player

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) सहा गटांपैकी दोन गट महिलांसाठी तर चार गट खुले झाले आहे. त्यामुळे येथून भारत कोकाटे, सीमंतिनी कोकाटे यांचा मार्ग मोकळा झाला असून उदय सांगळे यांचा दापूर गट मात्र महिला राखीव झाल्याने त्यांची संधी पुन्हा हुकली आहे. त्यामुळे माजी अध्यक्षा शीतल सांगळे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. खुले आणि ओबीसी गट झाल्याने कोंडाजी मामा आव्हाड यांचे पुतणे शशीकांत आव्हाड हे देखील नशीब अजमावू शकतात. माजी सभापती बाळासाहेब वाघ, निलेश केदार, राजेश गडाख देखील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

येवला तालुक्यात (Yeola Taluka) सर्वसाधारण तीन ओबीसी एक तर एक जागा एससी साठी राखीव झाले आहे. त्यामुळे पाटोदा गटातून माजी सभापती संजय बनकर, बाळासाहेब पिंपरकर तर नगरसुल गटातून पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, अंदरसुल गटातून मकरंद सोनवणे, महेंद्रकुमार काले, बाबा डमाळे, मुखेड गटातून माजी सदस्य बाळासाहेब गुंड, सचिन आहेर यांना संधी मिळू शकते. माजी सभापती सुरेखा दराडे यांच्या बरोबर दराडे कुटुंबीयांची मात्र संधी राखीव गटाने रोखली गेली आहे. कुणाल दराडे यांना नवीन गट शोधावा लागणार आहे.

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) सर्व गट एसटीसाठी राखीव झाल्याने येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, माजी सदस्य प्रवीण जाधव, विलास कड, शाम बोडके, मविप्र संचालक प्रविण जाधव, माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राजाभाऊ ढगे यांची अडचण झाली आहे. तर माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी सभापती सुनिता चारोस्कर, धनराज महाले, वैभव महाले तसेच मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांना जिल्हा परिषदेची पायरी चढण्याची संधी मिळणार आहे.

चांदवड तालुक्यातून (Chandwad Taluka) तळेगावरोही गट महिलांसाठी राखीव झाल्याने डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे चिरंजीव राहुल कोतवाल, गणेश निंबाळकर यांची संधी हुकली आहे. गट महिलांसाठी राखीव झाल्याने डॉ. कुंभार्डे यांच्या पत्नी डॉ. शिल्पा कुंभार्डे या रिंगणात उतरू शकतात. वडाळी भोई गट ओबीसींसाठी खुला झाल्याने येथून माजी सदस्य कारभारी आहेर, सभापती नितीन आहेर यांना संधी मिळू शकते. दुगाव गट एससी साठी राखीव झाल्याने माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड तसेच वडनेर भैरव गट एसटीसाठी राखीव झाल्याने भालेराव कुटुंबीय बाळासाहेब माळी यांना पाच वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे.

देवळा तालुक्यातील (Deola Taluka) तीन गट सर्वसाधारण साठी खुले झाल्याने येथून माजी सभापती केदा आहेर त्यांच्या पत्नी माजी सदस्या धनश्री आहेर, सुनील (गोटू) आहेर यांना संधी मिळू शकते. माजी सदस्य प्रशांत देवरे, मंत्री दादाभुसे यांचे भाचे अंकुश देवरे हे उमराणे गटातून आपले नशीब अजमावू शकतात. नाशिक तालुक्यातून चार पैकी तीन गट हे राखीव झाले असून पळसे हा एकमेव गट ओबीसींसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या गटातून अनेक दिग्गज उतरू शकतात. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी सदस्य संजय तुंगार या गटातून रिंगणात उतरू शकतात. गिरणारे गटातून आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माजी अध्यक्ष विजयश्री चुंभळे, माजी सभापती रत्नाकर चुंभळे यांची मात्र, अडचण झाली आहे.

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) सहा गटांपैकी तीन गट एसटी साठी दोन गट ओबीसी साठी तर एक गट खुला झाला आह. येथून माजी सदस्य यशवंत पाटील यांना ठेंगोडा नामपुरमधून गुलाबराव कापडणीस तर ब्राह्मणगाव गटातून वर्षा पप्पू (तात्या) बच्छाव, लता बच्छाव यांना संधी मिळू शकते. नामपुर गट सर्वसाधारण महिला झाल्याने यतिंद्र पाटील यांच्या पत्नी मनिषा यतिंद्र पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जायखेडा ओबीसी झाल्याने यतिंद्र पाटील या गटातून नशीब अजमाविण्याची शक्यता आहे. माजी सभापती उषा बच्छाव यांना देखील संधी प्राप्त झाली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) तिन्ही गट एसटी प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे येथून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विनायक माळेकर, रूपाजंली माळेकर यांना संधी मिळणार आहे.माजी उपाध्यक्षा नयना गावित, रविंद्र भोये, भारती भोये, काशीनाथ टेहरे देखील रिंगणात उतरू शकतात. गट राखीव झाल्याचा फटका माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांना बसला आहे. त्यामुळे त्यांचे यंदाही जिल्हा परिषदेची दरवाजे बंद झाले आहे. मालेगाव तालुक्यातून झोडगे गटातून देसले, खाकुर्डी गटातून ठाकरे घराणे, रावळगाव गटातून माजी सभापती अलका आखाडे, निमगाव गटातून माजी अध्यक्ष मधुकर हिरे, जे. डी. हिरे, कळवाडी गटातून माजी सदस्यता बलवीर कौल गिल, सौंदाणे गटातून माजी सभापती मनीषा पवार, दाभाडी गटातून निकम कुटुंबीय रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) सर्व गट सर्वसाधारण गटासाठी राखीव झाले आहे. साकोरा गटातून आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुमताई कांदे, न्यायडोंगरे गटातून माजी आमदार अनिल आहेर तसेच आहेर यांच्या कुटुंबातूनही उमेदवार राहू शकतो. भालूर गटातून माजी आमदार संजय पवार व त्यांचे बंधूमाजी सदस्य राजेंद्र पवार यांच्या लढत होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. युवा नेते तेज कवडे यांचा गट महिला राखीव झाल्याने त्यांच्या कुटुंबियातील महिला सदस्य रिंगणात उतरू शकतात.

कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) चारही गट एसटी महिला राखीव झाले आहे. त्यामुळे इथून माजी अध्यक्ष जयश्री पवार, गीतांजली पवार या पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे. रवींद्र देवरे, शैलेश पवार यांची मात्र, अडचण झाली आहे.

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) घोटी बुद्रुक हा एकमेव गट खुल्या प्रवर्गासाठी खुला झाला आहे. त्यामुळे या गटातून माजी सदस्य उदय जाधव, गोरख बोडके, निवृत्ती जाधव, संदीप गुळवे हे रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्यानेच निर्माण झालेल्या खंबाळे गटातून माजी सदस्य कावजी ठाकरे, जनार्दन माळी यांना मात्र कुटुंबातून महिलेला रिंगणात उतरवावे लागणार आहे. ज्ञानेश्वर लहांगे, संदीप वाजे, सुनील वाजे यांना मात्र प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पेठ तालुक्यातून (Peth Taluka) माजी सदस्य भास्कर गावित व त्यांचे पुत्र शाम गावीत यांच्या कुटुंबा भोवतीच तालुक्याचे राजकारण फिरत असल्यामुळे येथे गावित कुटुंबातीलच उमेदवार राहणार आहे. दुस-या गटातून गावित कुटुंब कोणाला संधी देते याकडे लक्ष लागले आहे. सुरगाणा तालुक्यातील चार पैकी तीन गट हे महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे एकमेव एसटी पुरूष गट झालेल्या हतगडमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी होऊ शकते. माजी आमदार जे.पी.गावित यांचे पुत्र इंद्रजीत गावित, चिंतामण गावित, माजी सभापती मंदाकिनी भोये, समीर चव्हाण, एन. डी. गावित हे तालुक्यातील गटांमधून उमेदवारी करू शकतात.

ताज्या बातम्या

महाड

मोठी बातमी! महाड राड्याप्रकरणी विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर शरण, अटकपूर्व जामीनावर...

0
मुंबई | Mumbaiरायगड जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मंत्री आणि शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर...