नाशिक । प्रतिनिधी Nashik
‘मतदार लोकशाहीचा खरा आधार’, ‘व्होटकर नाशिककर’, ‘सुजाण आणि जागरूक मतदार व्हा’, ‘मी मतदान केले आहे, तुम्हीही मतदान करा’, ‘चला आपण लोकशाही रुजवू या’, असा संदेश देत आज सकाळी नाशिककर मतदान जनजागृतीसाठी धावले. निमित्त होते महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे.
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा, स्वीपच्या मुख्य समन्वयक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने वोटोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा नगर येथील मैदानापासून या वोटोथॉनला सुरुवात झाली. तीन आणि पाच किलोमीटर अशा दोन गटात ही वोटोथॉन झाली.
यावेळी विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, अभिनेते किरण भालेराव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वोटोथॉनसाठी विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले. यावेळी या संस्थांचे पदाधिकारी, शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, संदीप सोनार, अनिरुद्ध अथनी, पूनम आचार्य, भूषण पटकरी, उपस्थित होते. डॉ. गेडाम, श्रीमती मित्तल यांनी मार्गदर्शन करीत मतदानाचे आवाहन केले.
वेशभूषेबद्दल गौरव
वोटोथॉनमध्ये मतदार जनजागृतीसाठी उत्कृष्ट वेशभूषा केल्याबद्दल कुंदा बच्छाव, तुषार पगार, प्रवीण खोडे, राहुल शिंपी, मनोहर जगताप, प्रतीक्षा वानखेडे यांना गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग
नाशिक स्कूल असोसिएशन च्या माध्यमातून 15 हुन अधिक शाळेने सर्व सहभागींना प्रोत्साहन केल्या. त्यामध्ये स्केटिंग, बँड, प्लास्टिक बँड, ढोल पथक, लेझीम यांचा विशेष सहभाग होता. या मध्ये इस्पॅलिअर स्कूल, जेम्स स्कूल, डीपीएस स्कूल, माउंट लेरिया स्कूल, आयुष स्कूल, ग्लोबल व्हिजन स्कूल, एमएटी मीना भुजबळ स्कूल अशा अनेक शाळा उपस्थित होत्या.
इस्पॅलिअर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्केटिंग करून मतदान जनजागृती केली.
वोटोबा करतोय जनजागृती
‘माझे मत माझा अधिकार’, असे सांगत जनजागृती करणारा वोटोबा उपस्थित होता. त्यानेही जनजागृती केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याच्या बरोबर मोबाईलवर सेल्फी घेतले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा