नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
जेलरोड येथील पंचक गाव व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याचप्रमाणे या बिबट्याने अनेक वन्यप्राण्यांना भक्ष्य केले होते. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये बिबट्याच्या दहशतीने घबराट निर्माण झाली होती.
बिबट्या जेरबंद करण्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी केली असता सदरचा पिंजरा लावण्यात आल्यानंतर शंकर बोराडे यांच्या मळ्यात असलेल्या पिंजर्यामध्ये शुक्रवारी रात्री बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गेल्या अनेक दिवसांपासून पंचक गाव व परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. परिणामी फिल्टर प्लांटजवळ असलेल्या शंकर बोराडे यांच्या मळ्यात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. सदर पिंजर्यामध्ये शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.
सदर माहिती नागरिकांना समजताच या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्यानंतर सदरची माहिती वनविभागाला माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी अनिल अहिरराव तसेच दर्शन देवरे, विशाल शेळके, अंबादास जगताप यांनी घटनास्थळी दाखल होऊन पिंजर्यासह बिबट्याला ताब्यात घेतले.