नाशिक | प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून आज दुपारी गुरू दक्षिणा सभागृहात उपस्थित तरुण- तरुणींनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली.
गुरू दक्षिणा सभागृहात आज दुपारी मोटिवेशनल वक्ते स्नेह देसाई यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ च्या मुख्य समन्वयक आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, तहसीलदार मंजुषा घाटगे यांनी उपस्थितांना ‘आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करितो, की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’, अशी शपथ दिली. तसेच वोटोबानेही उपस्थित मतदारांची भेट घेतली.
दरम्यान, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. रांगोळी, पोस्टर, आकाशकंदील, बाबांना पत्र… या माध्यमातून मतदारांना मतदानाची साद घालण्यात येत आहे. याशिवाय ‘वोटोबा’ मतदारांमध्ये मतदानाचे महत्व सांगत आहे.