कर्जत |प्रतिनिधी|Karjat
अहिल्यानगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व कंटेनरमधून डिझेल चोरी करणार्या सराईत टोळीला मिरजगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 15 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भगवान गोवर्धन पठारे (रा. सालेवडगाव, ता. आष्टी, जि. बीड), सुनील प्रमोद श्रीवास्तव (रा. इंदूर, मध्यप्रदेश, सध्या रा. सालेवडगाव), गणेश नवनाथ दहातोंडे (रा. सालेवडगाव) व आकाश दत्तू मोरे (मूळ रा. नांदगाव, जि. नाशिक, सध्या रा. निमगाव चोभा, ता. आष्टी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अहिल्यानगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असते. लांब पल्ल्याच्या गाड्या विश्रांतीसाठी अथवा जेवणासाठी ढाब्यांवर थांबत असताना आरोपी उभ्या ट्रक व कंटेनरमधून 400 ते 500 लिटर डिझेलची चोरी करत होते. तसेच काही ठिकाणी चालकांना मारहाण करून लुटण्याचे प्रकारही घडत होते. मिरजगाव, कर्जत व जामखेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असे प्रकार वाढले होते.
दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री गस्तीदरम्यान पोलिसांना एक संशयित स्विफ्ट व स्कॉर्पिओ कार भरधाव वेगाने जाताना दिसल्या. पाठलाग केल्यानंतर स्विफ्ट कार मिरजगावपासून तीन किलोमीटर अंतरावर तिखी गावाजवळ विद्युत खांबाला धडकली. कारमधील तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. स्कॉर्पिओ वाहन आष्टी (जि. बीड) दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. स्विफ्ट कारची झडती घेतली असता डिझेल चोरीसाठी वापरले जाणारे ड्रम, पाईप, लोखंडी कोयते व इतर साहित्य आढळून आले. याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींकडून 10 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ (एमएच 15 जीआर 2882), 5 लाख रुपये किमतीची स्विफ्ट (एमएच 14 सीसी 6977), तीन मोबाईल, सात रिकामे ड्रम, डिझेल काढण्याचे पाईप, कोयते, मिरचीपूड व दोरी असा एकूण 15.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी जामखेड व कर्जत पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांची कबुली दिली असून मिरजगाव, कर्जत, जामखेड परिसरात अशा प्रकारचे सुमारे 18 गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, सुनिल माळशिखरे, विकास चंदन, गणेश ठोंबरे, सुनिल खैरे, गोकुळ पळसे, राजेंद्र गाडे, बळीराम काकडे, रक्ताटे, नितीन शिंदे, राहुल गुंडू यांच्या पथकाने केली.





