नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवविले. यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची अड्डे उद्ध्वस्त केली होती. यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले. त्यालाही भारताने प्रत्युत्तर दिले. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबध ताणले गेले होते. मात्र, भारताच्या या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेचे देशातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर आता या मोहिमेत मोलाचे कार्य करणारे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी पराग जैन यांच्यावर केंद्र सरकारने आणखी मोठी जबाबदारी दिली आहे.
पराग जैन (Parag Jain) यांची केंद्र सरकारने रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. जैन हे सध्याचे रॉ प्रमुख रवी सिन्हा (Ravi Sinha) यांची जागा घेणार आहेत. सिन्हा यांचा सध्याचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. त्यानंतर जैन ०१ जुलै २०२५ रोजी दोन वर्षांच्या निश्चित कार्यकाळासाठी पदभार स्वीकारणार आहेत. जैन हे पंजाब कॅडरचे १९८९ चे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी चंदीगडचे एसएसपी म्हणून काम पहिले आहे.
यासोबतच पराग जैन यांनी कॅनडा आणि श्रीलंकेत (Canda and Shrilanka) भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. जैन जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात आहेत. दहशतवादविरोधी रणनीतीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या एव्हिएशन रिसर्च सेंटर (ARC) चे प्रमुख म्हणून काम करत आहेत. या संस्थेने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांची गुप्त माहिती गोळा केली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने (Indian Army) ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीरित्या राबवले.
दरम्यान, पराग जैन हे गुप्तचर वर्तुळात ‘सुपर स्पाय’ म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे जैन हे मानवी आणि तांत्रिक बुद्धीमत्ता एकत्रित करण्यासाठी ओळखले जातात. त्यांची ही भूमिका अनेक महत्त्वाच्या ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची राहिलेली आहे. पराग जैन यांचे पंजाबमध्ये (Punjab) दहशवादविरोधात मोठे कार्य आहे. अतिरेकी जेव्हा पंजाबमध्ये दहशतवाद निर्माण करत होते, तेव्हा भटिंडा, मानसा, होशियारपूर येथे पराग जैन यांनी विशेष ऑपरेशन राबवत पराग जैन यांनी दहशतवाद्यांना संपवले होते.




