मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील काही विद्यार्थी चेन्नई येथे कॉग्निझंट या कंपनीत इंटर्नशिपसाठी गेले होते. यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शनिवार (दि.२१) रोजी (गोल्डन बीच) समुद्रकिनारी (Golden Beach Chennai) फिरायला गेलेल्या २६ तरूणांपैकी तिघेजण सेल्फी घेताना पाण्यात वाहून गेले. या दुर्दैवी घटनेत भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) वरठी येथील मयुरी उर्फ माही हरिश्चंद्र चौधरी हिचा मृत्यू झाला आहे. तर एका मुलाचा अद्याप शोध सुरू असून, एकाला सुखरुप वाचविले आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला. त्यानंतर स्थानिक सरकारकडून सध्या समुद्रात सर्च ऑपरेशन सुरू आहे. महाराष्ट्र सरकारही या घटनेवर लक्ष ठेवून असून पीडित कुटुंबाला लागणारी सर्व मदत करण्यासाठी संपर्क केला जात आहे.
याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO Office) दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली. या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून ते मदत व बचाव कार्यावर सतत देखरेख ठेवून आहेत. तर तामिळनाडू शासनाकडून प्राप्त माहितीनुसार २६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच राज केदारी याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद घटनेबद्दल मयुरी चौधरी (Mayuri Choudhary) यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य प्रशासन संबंधित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात आहे, असंही मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.
नातेवाईक चेन्नईकडे रवाना
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नई येथे पोहोचले आहेत. तर मयुरी चौधरी हिचे नातेवाईक नागपूरहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. मयुरीच्या निधनाची माहिती तिच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलीकडून घरच्यांना मिळाली. १५ दिवसांपूर्वीच मयुरी नोकरीला लागली होती. शनिवारी सुट्टी असल्याने मयुरी इतर सहकाऱ्यांसोबत फिरायला गेली होती. सकाळी ७ च्या सुमारास या घटनेविषयी मला माहिती मिळाली. माझे वडील, दादा आणि वडिलांचे मित्र चेन्नईला गेले आहेत अशी माहिती तिच्या भावाने माध्यमांना दिली. या घटनेमुळे मयत मयुरी हिच्या भंडारा येथील तिच्या घरी शोककळा पसरली आहे.
सेल्फीचा मोह जीवावर बेतला
तामिळनाडू सरकारने दिलेल्या माहितीनुसार २६ पैकी केवळ तीन विद्यार्थी पाण्यात उतरले होते. मुले समुद्रात उतरून सेल्फी घेत होते. त्यावेळी समुद्रात १० ते १५ फुटांची लाट उसळली. आणि तीन मुलं समुद्रात ओढली गेली. यात भंडारा येथील मयुरी चौधरी हिचा मृत्यू झाला तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही. तर एकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.





