Tuesday, May 26, 2026
Homeमुख्य बातम्याMaharashtra Politics : सरकारकडून केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक; वडेट्टीवारांचा हल्लाबोल, चहापानावर...

Maharashtra Politics : सरकारकडून केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक; वडेट्टीवारांचा हल्लाबोल, चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठकीकडे पाठ

मुंबई | Mumbai

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या (सोमवार) पासून सुरुवात होत आहे. त्याआधी आज (रविवारी) अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक (Mahavikas Aaghadi Meeting) बोलविण्यात आली होती. या बैठकीस शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे (Sharad Pawar NCP) नेते वगळता शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यात आमदार भास्कर जाधव, अजय चौधरी, सतेज पाटील, अनिल परब, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे आणि अमीन पटेल यांचा समावेश होता. यावेळी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत सरकारवर जोरदार टीका केली.

- Advertisement -

यावेळी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, राज्य सरकारकडून केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक होते आहे. मग आम्ही चहापानाला का जायचे? ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ हे ब्रीदवाक्य घेत त्या भरवशावर सत्ता मिळवली. शेष नागावर पृथ्वी अशी आख्यायिका आहे तसे आयत्या बिळावर नागोबा अशी स्थिती आहे. राज्यात कुठेही एमएसपीने शेतीमाल खरेदी केला जात नाही. बेरोजगारी, गुंतवणूक कुठे आहे? यवतमाळमध्ये एका महिन्यात २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना किडनी विकावी लागतेय. दावोसला जावून काय आणले याचा व्हाईट पेपर काढलाच पाहिजे. महाराष्ट्र लुटला जात असून, राज्यात सर्व कामे मॅनेज करून दिली जातात, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले, “विद्यमान उपमुख्यमंत्री (DCM) यांचा अपघात होतो आणि शंका उपस्थित करू नये म्हणता. शासनाकडून केवळ दोन ओळींची लाईन म्हटली जाते. यात कुठेही, कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करु नये. का करु नये? हा घातपात आहे की अपघात आहे? या संदर्भात महाराष्ट्रासह देशभर चर्चा आहे. सरकारची भूमिका संदिग्ध आहे. महाराष्ट्र बघत आहे, अशावेळी आम्ही का जायचं” असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला.

लाडक्या बहीणींना तीन हजार कधी देणार?

लाडक्या बहिणींमुळे कर्जबाजारी झालो असं भास्करराव बोलले. त्यामुळे बाकी योजनांना कात्री लावली. डावोसमध्ये जाऊन ३० लाख कोटींचे करार केले. आम्ही या संदर्भात व्हाइट पेपरची मागणी करणार आहोत. महाराष्ट्रातील बहिणींना १५०० च्या ठिकाणी ३००० का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येत आहे. हे सर्व ढोंग आहे. महाराष्ट्र लुटला जात असून, प्रचंड भ्रष्टाचार आहे.कमिशनखोरी सरळसरळ २० ते २५ टक्क्यावर जात आहे. सर्व कमिशन घेतली की कामं वाटली जातात” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

सत्ताधाऱ्यांसचे वर्तन लोकशाहीला, संविधानाला धरून नाही

यावेळी बोलतांना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. ⁠प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे सरकार मस्तीत आहे, त्यांना त्याचा माज आहे. मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाला आम्ही जाणार नाही, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार अशी प्रथा पडलीय असं काहींना वाटेल. मात्र तसं नाही. सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचे आणि संविधानाला अनुसरून हवं तसं वागणूक मिळत नाही. खरं तर आम्ही सत्ताधाऱ्यांच्या चहा प्यायला जात नसतो तर सरकारी तिजोरीतील पैशातून चहा प्यायला जात असतो. लोकशाही मार्गाने हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे अंग आहे. मात्र सरकारला मोठे बहुमत मिळाले आहे, त्यामुळे ते विरोधकांचा सन्मान राखत नाही. सत्ताधाऱ्यांच वर्तन समर्थनीय नाही. लोकशाहीला, संविधानाला धरून नाही. म्हणून आम्ही या चहा पाण्यावर बहिष्कार टाकत आहोत, असे त्यांनी म्हटले.

बैठकीला राष्ट्रवादीची दांडी

ठाकरे गटाचे कार्यालय असलेल्या ‘शिवालय’मधील बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. मात्र, या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे मविआत बिघाडी झाली की काय? असा सवाल विचारला जात आहे. दुसरीकडे यावर बोलतांना भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीचा मित्रपक्ष कुठे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, कम्युनिकेशन गॅपमुळे राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित नसल्याचे त्यांनी म्हटले. राज्यातील महायुती सरकारचा एकत्रितपणे विरोध कसा करायचा, यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित होती. मात्र, राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीमुळे मविआमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन मंजूर

0
पुणे | प्रतिनिधी Pune राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांना पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या न्यायाधीश अलीशा बागल यांनी मोठा...