नवी दिल्ली | New Delhi
भारताचे ५३ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India ) म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत (Chief Justice Suryakant) यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत यांना १५ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. यावेळी शपथविधी सोहळ्यात भावनिक क्षणही पाहायला मिळाले. शपथ घेतल्यानंतर लगेचच सूर्यकांत यांनी माजी सरन्यायाधीश बी.आर.गवई यांची गळाभेट घेतली. त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
हरियाणातील (Haryana) हिसार जिल्ह्यातील (Hisar District) एका साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सूर्यकांत यांनी ग्रामीण भागातील बेंच नसलेल्या एका शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले आणि देशाच्या सर्वोच्च सरन्यायाधीश पदापर्यंत मजल मारली. सूर्यकांत यांचा जन्म हरियाणाच्या हिसारमध्ये १० फेब्रुवारी १९६२ रोजी झाला. त्यांनी १९८१ मध्ये हिसारच्या सरकारी पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर, १९८४ मध्ये रोहतकच्या महर्षी दयानंद विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. एलएलबी पूर्ण केल्यावर, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी १९८४ मध्ये हिसार जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली. वर्षभरातच ते चंदीगडला स्थलांतरित झाले आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात संवैधानिक, सेवा आणि दिवाणी प्रकरणांमध्ये विशेषज्ज्ञ म्हणून ओळख मिळवली.
तसेच वयाच्या ३८ व्या वर्षी म्हणजेच ७ जुलै २००० रोजी त्यांची हरियाणाचे सर्वात तरुण अॅडव्होकेट जनरल म्हणून नियुक्ती झाली. ९ जानेवारी २००४ रोजी ते पंजाब (Punjab) आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर, ५ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. तर २४ मे २०१९ रोजी त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. विशेष म्हणजे २०११ मध्ये त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण केली. इतक्या उच्च पदावर पोहोचल्यानंतरही शिक्षण सुरू ठेवण्याची त्यांची तळमळ यावरून दिसून येते.
दरम्यान, सूर्यकांत यांनी कायद्याद्वारे स्थापित भारतीय संविधानाप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगण्याची शपथ घेतली. मी भारताचे सार्वभौमता आणि अखंडता अबाधित ठेवेन आणि आपले कर्तव्य भीती किंवा पक्षपात, अनुराग किंवा द्वेष याशिवाय पार पाडेन,’ अशी शपथ (Sworn) त्यांनी घेतली. त्यांनी आपल्या संपूर्ण क्षमतेने, ज्ञानाने आणि विवेकाने पदाच्या कर्तव्यांचे पालन करण्याचे वचन दिले आहे. तसेच ते संविधानाच्या आणि कायद्याच्या मर्यादांचे पालन करतील असेही त्यांनी आपल्या शपथेमध्ये नमूद केले. सूर्यकांत यांचा कार्यकाळ ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत असणार आहे.




