नवी दिल्ली | New Delhi
देशात वस्तू आणि सेवा कर (GST) व्यवस्थेत उद्यापासून (दि.२२ सप्टेंबर) मोठे बदल होणार असून, त्याची अंमलबजावणी देखील तात्काळ केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (सोमवारी) देशाला संबोधित केले. या बचत उत्सवाचा सर्वांना फायदा होणार असून, आत्मनिर्भर भारतासाठी मोठे पाऊल उचलत आहोत, असे मोदींनी सांगतिले.
यावेळी ते म्हणाले की, “उद्यापासून नवरात्रत्सोवाला सुरुवात होत असून, नवे जीएसटी (GST) दर लागू होत आहेत. कररचनेत मोठे बदल केल्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्ती आनंदी होत आहे. यामुळे स्वदेशीला चालना मिळणार असून, लघुउद्योगांना मोठा फायदा होणार आहे. जीएसटीचा गरीबांवर मोठा बोजा पडत होता. आता ५ आणि १८ टक्के जीएसटी स्लॅब उद्यापासून लागू होणार आहे. यामुळे लहान दुकानदारानाही मोठा फायदा होणार आहे”, असेही मोदी यांनी म्हटले.
तसेच “या जीएसटी बचत उत्सवात आपली बचत वाढेल आणि आपण आपल्या आवडत्या वस्तूंना आणखी सोप्या पद्धतीने खरेदी करु शकणार आहात. त्यामुळे सणासुदीला सर्वांचे तोंड गोड होईल. सर्वांच्या कुटुंबांमध्ये आनंद येईल. मी देशाच्या सर्व नागरिकांचे या निमित्ताने अभिनंदन करतो”, असे मोदी म्हणाले.
स्वदेशीचा दिला नारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करतांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहनही देशातील नागरिकांना केले. देशात सध्या विदेशी वस्तूंची खरेदी केली जाते. पण आता आपण आपल्या देशातील कंपन्यांच्या वस्तू खरेदी कराव्यात. याने आत्मनिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण होईल, असेही त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : GST 2.0 : उद्यापासून जीएसटी कररचनेत होणार मोठे बदल; काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या संपूर्ण यादी
बचत उत्सवाचा खूप मोठा फायदा होणार
आपल्या देशाचे गरीब, मध्यमवर्गीय, तरुण, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी सर्वांसाठी या बचत उत्सवाचा खूप मोठा फायदा होणार आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार असून, मी देशातील कोट्यवधी कुटुंबांना जीएसटीच्या नव्या सुधारणांबद्दल शुभेच्छा देतो. या सुधारणा भारताच्या विकासाला गतिमान करतील. व्यवसायांना आणखी सोपे केले जाईल. या नव्या सुधारणांमुळे प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीने यायला मदत होईल. २०१७ साली भारताने जीएसटीच्या सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकले होते. नवा इतिहास रचण्याची ही एक सुरुवात होती. अगोदर देशातील जनता वेगवेगळ्या करांमध्ये अडकलेली होती. पण आता देशभरात टॅक्सचे एकच नियम आहे”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
देश भल्यामोठ्या करांच्या जाळ्यातून मुक्त
केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे देश भल्यामोठ्या करांच्या जाळ्यातून मुक्त झाला आहे. वन नेशन वन टॅक्सचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रिफॉर्म सातत्याने चालणारी प्रक्रिया असते. जेव्हा वेळ बदलते तेव्हा देशाची गरज बदलते. तेव्हा नेक्स्ट जनरेशन बदल तितकेच आवश्यक असते. देशाची सध्याची गरज आणि भविष्याची गरज पाहता जीएसटीचे नवे रिफॉर्म्स लागू होत आहेत. आता फक्त ५ टक्के आणि १८ टक्के टॅक्स स्लॅब राहतील. दररोज लागणाऱ्या वस्तूंचे दर आणखी कमी होतील. अन्न धान्य, औषधे, साबण, ब्रश, पेस्ट, आरोग्य आणि जीवन विमा अशा अनेक गोष्टी आणि सेवा करमुक्त होतील किंवा ५ टक्के कर भरावा लागेल. गेल्या ११ वर्षाच्या काळात २५ कोटी लोकांनी गरिबीला पराभूत केले आहे.




