नवी दिल्ली | New Delhi
येथील लाल किल्ला (Red Fort) मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये (Car) सोमवारी (दि. १० नोव्हेंबर) रोजी संध्याकाळी मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून, जखमींना तातडीने उपचारासाठी दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात (LNJP Hospital) दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे देशातील महत्त्वाच्या शहरांत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर होते. हा दौरा आटपून भारतात परतल्यानंतर त्यांनी तात्काळ एलएनजेपी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. यावेळी मोदींनी जखमींची विचारपूस करत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. या घटनेनंतर मोदींनी भूतानमधील एका कार्यक्रमात बोलतांना कटकारस्थान करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी रुग्णालयात जाऊन स्फोटात जखमी झालेल्यांची विचारपूस केली.
दरम्यान, दिल्ली स्फोटातील घटनेनंतर केंद्र सरकार (Central Government) अॅक्शनमोडमध्ये आले असून, याबाबत आज संध्याकाळी सुरक्षा व्यवस्थेवरील मंत्रिमंडळ समितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ५:३० वाजता पंतप्रधान निवासस्थान ७ लोक कल्याण मार्ग येथे बैठक होणार आहे. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे.तर दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, तपास यंत्रणांकडून चौकशीला वेग आला आहे.




