नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) किश्तवाडमधील घनदाट जंगलात गेल्या महिनाभरापासून दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराने ‘जैश-ए-मोहम्मद’चा (Jaish-e-Mohammed) टॉप कमांडर कुख्यात सैफुल्ला आज (रविवारी) झालेल्या एका भीषण चकमकीत ठार झाल्याचे बोलले जात आहे. तर दोन दहशतवादी गंभीर जखमी झाले आहेत. सैफुल्ला याच्यावर १० लाखांचे बक्षीस होते.
किश्तवाडच्या छातरू भागातील जंगलात गेल्या ३६ दिवसांपासून दहशतवादविरोधी मोहीम सुरू आहे. भारतीय लष्कर आणि एसओजीच्या संयुक्त पथकाने या परिसरात दहशतवाद्यांना वेढा घातला होता. आज (रविवारी) दुपारी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला.या चकमकीत सुरक्षा दलांनी सैफुल्ला याला जागीच ठार केल्याचे समजते. यापूर्वी जैशचा आदिल नावाचा दहशतवादी मारला गेला होता. तर सैफुल्ला आणि त्याचे साथीदार हुलकावणी देत होते. अखेर आज लष्कराने त्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच दहशतवाद्यांना (Terrorists) निसटण्याची कोणतीही संधी मिळू नये, यासाठी लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. घनदाट जंगल असल्यामुळे ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या साहाय्याने संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली जात आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे दोन साथीदार जखमी अवस्थेत जंगलात लपून बसले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराच्या (Indian Army) व्हाईट नाईट कॉर्प्सने एका निवेदनात म्हटलं की, ‘ऑपरेशन त्राशी १’ अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. पोलीस आणि इतर गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या विश्वासार्ह गुप्त माहितीनंतर जम्मू आणि काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
अधिकाऱ्यांनी काय म्हटले?
अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद गटाशी संबंधित दोन पाकिस्तानी दहशतवादी तिथे उपस्थित असल्याची माहिती पथकांना मिळाली होती. – डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका मातीच्या घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिक जवळ येताच गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. अशाच प्रकारे गेल्या महिन्यात चतरू वनपट्ट्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जवळपास सहा वेळा गोळीबार (Firing) झाले होते. ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला होता.





