नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
तेलंगणातील (Telangana) संगारेड्डी जिल्ह्यातील एका गोळ्या-औषधं तयार करणाऱ्या कारखान्याच्या (Factory) अणुभट्टी युनिटमध्ये भीषण स्फोट (Explosion) झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, २० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी सकाळच्या सुमारास हा स्फोट झाला असून, स्फोटावेळी कारखान्यात
१०० पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते. तसेच हा स्फोट इतका भयंकर होता की मृतदेह (Dead Body) १०० फुटावर जाऊन पडले. तर स्फोटाचा आवाज काही किलोमीटर पर्यंत ऐकू गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हा स्फोट कशामुळे झाला याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तर अग्निशमन विभागाच्या (Fire Department) अधिकाऱ्याने सांगितले की, ” ढिगाऱ्यातून पाच कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर १३ कामगारांना वाचवण्यात आले आहे. तसेच २० हून अधिक कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे. तर ढिगार्याखाली अनेक लोक अडकल्याचे त्यांनी सांगितले. सध्या बचाव आणि मदत कार्य सुरू असून, घटनास्थळी ४ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, ज्या कारखान्यात स्फोट झाला तो कारखाना १९८९ पासून मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज (MCC) बनवत आहे. ही पांढऱ्या रंगाची पावडर असून, त्याला वास किंवा चव नाही. या एमसीसीचा वापर औषध आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगांमध्ये केला जातो. सिगाची इंडस्ट्रीजचे हैदराबादसह देशभरात पाच कारखाने असून, कंपनीची उत्पादने ६५ हून अधिक देशांमध्ये (Country) निर्यात केली जातात.





