नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतचोरीचा आरोप केला होता. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आज (सोमवार) दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयआर’ आणि ‘मतचोरीच्या’ आरोपांवरून संसदेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला आहे.
इंडिया आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चात विरोधी पक्षाचे ३०० हून अधिक खासदार (MP) सहभागी झाले असून, संसदेच्या मकर द्वार ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येत आहे. खासदारांच्या या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह (Delhi Police) निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत.
दरम्यान, पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून मोर्चा थांबविला असून, राहुल गांधीसह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतले आहे. इंडिया आघाडीच्या या मोर्चात खासदार राहुल गांधी, अखिलेश यादव, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग आहे. यावेळी निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फलकही झळकवण्यात आले.
लोकसभा दुपारपर्यंत तहकूब
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज १६ वा दिवस असून, लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी खासदारांनी गोंधळ सुरू केला. यावेळी खासदारांनी ‘वुई वॉन्ट जस्टिस’च्या घोषणा देत सभागृहाच्या वेलमध्ये पोहोचले. यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केली.





