Sunday, October 11, 2026
Homeधुळेपर्यावरणाची हानी ही मानवी विनाशाचे कारण - डॉ. राजकुमार खपेकर

पर्यावरणाची हानी ही मानवी विनाशाचे कारण – डॉ. राजकुमार खपेकर

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

पर्यावरणाची हानी ही मानवी विनाशाचे कारण ठरू शकते असे प्रतिपादन डॉ. राजकुमार खपेकर यांनी केले.

- Advertisement -

येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. कॅ. डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बायोडायव्हर्सिटी अंड वेज ऑफ रिस्टोरेशन या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद घेण्यात आला. त्यावेळी डॉ. राजकुमार खपेकर हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मनोहर पाटील हे होते.

परिसंवादाला अण्णा युनिव्हर्सिटी, आसाम युनिव्हर्सिटी, राजुरी युनिव्हर्सिटी, भोपाळ, कोईमतूर, छत्तीसगड, अहिल्यादेवी यूनिवर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, दिल्ली विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ, बरेली विद्यापीठ, बालानगर विद्यापीठ, वेस्ट बेंगॉल युनिव्हर्सिटी अशा देशभरातील सुमारे 30 विद्यापीठातील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी सहभाग घेतला होता. परिसंवादासाठी संस्थेचे चेअरमन आ. कुणाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. खापेकर यांनी आज पर्यावरणामध्ये होत असलेला र्‍हास आणि जैवविविधता संरक्षणाची गरज याविषयी मार्गदर्शन करत असतांना मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल हा पूर्वस्थितीत आणण्यासाठी माणसाला जैवविविधतेचे जतन करणे आवश्यक आहे. पर्यावरण जतनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. जैवविविधतेचे जतन करताना जंगली वनस्पतीचे संरक्षण करणे ही किती महत्वाचे आहे. पर्यावरणाची हानी ही मानवी विनाशाचे कारण ठरू शकते असे त्यांनी सांगितले. सागरी जलीय वनस्पती या ऑक्सीजन मेंटेनन्स मध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात परंतु या शैवाल वर्गीय वनस्पतींचे जीवनमान औद्योगिक क्षेत्रामधून सोडल्या जाणारे पाणी, घातक रसायन आणि माणसाच्या हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेले आहे आणि त्यामुळे कदाचित उद्या वातावरणातील ऑक्सिजनपातळी ही मोठ्या प्रमाणावर खालावू शकते.

आजच आपण मोठ्या प्रमाणावर अंटार्तिकवर बर्फ स्लाइडिंगच्या घटना, बर्फ वितळण्याचा घटना आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या घटना बघतो आहोत हा इशारा समजावा आणि माणसाने जैवविविधता सुधारण्यासाठी आजच पुढाकार घ्यावा. प्रत्येक माणसाने आपल्या परीने जैव-विविधता सुधारण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करायला पाहिजेत. पाण्यामध्ये कारंजे आणि अगदी आपल्या घरापाशी छोटासा वृक्षलागवड करून ते आपल्या घरातील नळ, विजेचा बल्ब किंवा विद्युत उपकरणे बंद करून या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून पर्यावरणाचा होणारा रहास सुधारणे ही आजच्या काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.

डॉ. पाटील म्हणाले की, वनस्पतीशास्त्र व पर्यावरण संरक्षण यांचा सबंध स्पष्ट केला. आज खर्‍या अर्थाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी संपूर्ण जगावर आली आहे हे स्पष्ट केले. ही जबाबदारी म्हणूनच महाराष्ट्रतील एकमेव महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग चांगल्या पद्धतीने निभावत आहे. असे त्यांनी सांगितले. यावेळी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संध्या पाटील, उपप्राचार्य प्रा. के. एम. बोरसे, परिसंवादाचे सेक्रेटरी प्रा. मयूर डोंगरे व डॉ. दत्ता ढाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोले यांनी केले.

ताज्या बातम्या