Friday, May 31, 2024
Homeनगरशारदीय नवरात्रोत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरूवात

शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरूवात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रविवारी नगर शहराजवळील प्रसिध्द बुर्‍हाणनगर (ता. नगर), केडगाव येथील देवी मंदिरासह शहरातील लहानमोठ्या देवी मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. यासह घरगुती घटस्थापनेसोबत घराघरांत देवीचे आगमन झाले असून पुढील नऊ दिवस मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव पार पडणार आहे.

- Advertisement -

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे बुर्‍हाणनगर येथील पुरातन मंदिरात काल सकाळी महापूजा, अभिषेक होऊन दुपारी 12 वाजता आईराजा उदोउदो, सदानंदाचा उदो उदो, तुळजाभवानी माताकी जय अशा जयघोषात विधीवत घटस्थापना झाली. यावेळी मंदिराचे पुजारी भगत कुटुंबियांच्या सुवासिनींनी डोक्यावर घट घेऊन मंदिर परिसराला वाजतगाजत प्रदक्षिणा मारली. या शोभायात्रेनंतर मंदिराचे मुख्य पुजारी अ‍ॅड. विजय भगत व अ‍ॅड. अभिषेक भगत यांनी मंदिरात विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती केली.नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी मढण्यात आली आहे.

देवीच्या दर्शनास भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. ऑक्टोबर महिना असल्याने भाविकांचा उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी मंदिर परिसरात मंडप टाकण्यात आले आहेत. यावर्षांपासून देवीच्या मुखदर्शनाचीही सोय करण्यात आली असून भाविकांना मंदिरातूनच देवीचे मुखदर्शन करता येणार आहे. यासाठी वेगळी रांग असणार आहे. केवळ गाभार्‍याची स्वच्छता व मंदिराच्या साफसफाईसाठी मंदिर काहीवेळ बंद असणार असून भाविकांना 21 तास देवीचे दर्शन करता येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त पुढील 10 दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नागापूर येथील श्री रेणुकामाता देवी मंदिरात आ. संग्राम जगताप यांच्याहस्ते घटस्थापना करून महाआरती करण्यात आली. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक राजेश कातोरे, रेणुकामाता देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर, बाळासाहेब जगताप आदी उपस्थित होते. यावेळी देवीची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. नवरात्र उत्सवानिमित्त रेणुकामाता देवी मंदिरात आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांसाठी दर्शनासाठी योग्य दर्शनबारीची व्यवस्था, सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहे. तसेच या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आकर्षित कारंजा उभारण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी नऊ दिवस विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानच्यावतीने देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या