Wednesday, January 7, 2026
HomeनगरPathardi : मोहटा गडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

Pathardi : मोहटा गडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

न्यायाधीश महेश लोणे यांच्या हस्ते उद्या होणार घटस्थापना

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शारदीय नवरात्र महोत्सवाची श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान येथे तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी देवस्थान सज्ज झाले आहे. उद्या सोमवारी (22 सप्टेंबर) रोजी जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश लोणे यांच्या हस्ते घटस्थापना होऊन उत्सवाला प्रारंभ होईल. पाथर्डी शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर मोहटादेवीचे स्वंयभू स्थान आहे. हे मंदिर देशातील देवी मंदिरांपैकी असून मंदिराची रचना श्री यंत्रकार यांनी केली आहे. या ठिकाणी अश्वीन शुद्ध प्रतिप्रदोषापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पूजा चालते.

- Advertisement -

या काळात दैनंदिन होमहवन, सप्तशती पाठ, जागर, गोंधळ, भजन, हरिपाठ आदी धार्मिक विधीसोबतच राज्यातील नामवंतांचे कीर्तन होणार आहे. राष्ट्रसंत आचार्य गोविंददेव गिरिजी महाराज यांची श्रीमद् देवीभागवत कथा 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार असून 1 ऑक्टोबर रोजी तारकेश्वर गडाचे आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. अष्टमी होमहवन 30 सप्टेंबर रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते होईल. दसर्‍याच्या दिवशी सायंकाळी सिमोल्लंघन सोहळा आणि शस्त्रपूजन होईल. 3 ऑक्टोबर, अश्विन शुद्ध एकादशीला मोहटादेवीची यात्रा असून गावात दिवसभर पालखी दर्शन, रात्री उत्सव मूर्तीची पालखी मिरवणूक निघून मध्यरात्रीनंतर गडावर शोभेची दारू उडविण्यात येणार आहे.

YouTube video player

4 ऑक्टोबरला सकाळी कलाकारांच्या हजेर्‍या आणि दुपारी कुस्तीचा हगामा होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. 6 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेला रात्री महाआरती व दुग्धप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता होईल. नवरात्र काळात कुमारिका पूजन, सुवासिनीची ओटी भरणे, दृष्ट काढणे, कुंकुमार्चन पूजा आदी विधी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरे होतात. घट बसविण्यासाठी राज्याच्या विविध भागातून हजार महिला मंदिराच्या पारायण व महाप्रसाद हॉलमध्ये दाखल होत आहेत. सुसज्ज भक्तनिवास, अहोरात्र मोफत महाप्रसाद, विशेष अतिथी निवास आणि भव्य वाहनतळाची सुविधा आहे. मुख्य दर्शन मार्गामध्ये अष्टभैरव, चौसष्टयोगिनी, दशमहाविद्या मंदिरे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात अशी मंदिरे कोठेही नाहीत.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाची आराध्यदेवी येथे असून अनेक भाविक त्या देवीपुढे विशिष्ट विधी करतात; त्रिकाळ आरतीसाठी भाविकांची गर्दी असते. ऐंशी ते शंभर किलोमीटर परिसरातून भाविक पायी चालत दर्शनासाठी येतात. नगर-पाथर्डी रस्ता पायी चालणार्‍या भाविकांच्या गर्दीने फुलून जातो. संपूर्ण मार्गावर चहा-पाणी, फराळ, महाप्रसाद, औषधोपचार मोफत दिले जातात. झालेल्या पावसामुळे देवी गडसह परिसरात सर्वत्र निसर्ग बहरला आहे. देवस्थान समितीच्या गाड्यांसह राज्य परिवहन महामंडळाच्या बीड, नगर, औरंगाबाद, पुणे विभागातून जास्त गाड्या सुरू झाल्या आहेत. सुसज्ज दर्शनरांग व भव्य गाभार्‍यामुळे भाविकांना दर्शन सुलभतेने होणार आहे.

देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान समितीचे विश्वस्त पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश रविकिरण सपाटे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, प्र. गटविकास अधिकारी संगीता पालवे, शशिकांत दहिफळे, बाळासाहेब दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, श्रीराम परतानी, अ‍ॅड. कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, अ‍ॅड. विक्रम वाडेकर आदी यात्रेच्या नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. तालुक्यातील धामणगाव देवी, दगडवाडी, तोंडोळी, वडगाव, तिसगाव, खांडगाव, रेणुकाईवाडी, कोल्हार आदी स्थानांसह पाथर्डी शहरातील सर्व देवीमंदिरे आकर्षक विद्युत रोषणाईने सजली आहेत.

भाविकांची गर्दी पाहता पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात मोहटादेवी भक्तनिवास पासून रस्त्याच्या बाजूला असलेले अतिक्रमणे शनिवारी दुपारी काढायला सुरुवात करण्यात आली. मोहटादेवी गडावरील रस्त्याचे रुंदीकरण झाले असून सध्या सिमेंट काँक्रिटीकरण, रस्ता खडीकरण व मुरमीकरणाने काही ठिकाणी काम करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...