मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंडरवर्ल्ड क्षेत्रातील लोकांशी व्यवहार केल्याने तुरुंगवास झाला होता. त्यानंतर त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर झाला होता. यानंतर मलिक हे नेमके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार की अजितदादांच्या? याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. त्यानंतर अखेर आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसे संकेतच मलिक यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्रोफाईलमधून दिले आहेत.
हे देखील वाचा : PM Modi Speech : एक देश, एक निवडणूक ते महिलांची कामगिरी; मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
नवाब मलिक यांनी मागील सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीचे (NCP) पक्षचिन्ह असलेले घड्याळ हे चिन्ह वापरणे बंद केले होते.तसेच मलिक यांच्याकडून सातत्याने आपण कोणत्याच गटासोबत नसल्याचे जाहीर केले होते. पंरतु, आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नवाब मलिक यांनी घड्याळ चिन्ह वापरण्यास सुरूवात केली आहे.त्यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्रोफाईलवर घड्याळ चिन्हाचा वापर केला आहे.
हे देखील वाचा : समाजातील सर्व घटकांचा विकास हाच शासनाचा ध्यास – पालकमंत्री भुसे
तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राज्यात सुरु असलेली जनसन्मान यात्रा २० तारखेनंतर नवाब मलिक यांच्या मुंबईतील (Mumbai) अणुशक्तीनगर या मतदारसंघात जाणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मलिक यांना उमेदवारी मिळाल्यास नवल वाटायला नको. तसेच जर मालिकांना उमेदवारी दिली तर महायुतीमध्ये त्याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Nashik News : अद्वय हिरेंना दिलासा; नऊ महिन्यांनी तुरुंगातून सुटका
नवाब मलिकांमुळे महायुतीत नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता
नवाब मलिकांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये आगामी काळात नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे. कारण जामिनानंतर सहा महिने प्रसिद्धीपासून दूरच राहिलेले नवाब मलिक गेल्या डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी मलिक सभागृहात सत्ताधारी महायुतीच्या बाकांवर बसले होते. त्यामुळे ही बाब भाजपला रुचली नाही. त्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांना पत्र पाठवत ” नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत हे पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही”, असे सांगितले होते.
हे देखील वाचा : विधानसभेला कर्जत-जामखेडमधून अजितदादा रिंगणात उतरणार?
नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय निकाल देत नाहीत तोपर्यंत ते बाहेरच असणार आहे. न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्यासमोर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा