मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजी नगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपाने विरोध केलाय. त्यामुळे महायुतीतील वाद समोर आलाय. तसेच नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच नवाब मलिक यांचे दाऊतशी संबंध असल्याचा आरोपांचा भाजपाच्या काही नेत्यांनी केला होता. त्याला आता नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझा दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना कायदेशीर नोटिस बजावणार असल्याचा इशाराच नवाब मलिक यांनी दिला आहे.
दाऊदशी संबंध जोडणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना इशारा देताना नवाब मलिक म्हणाले की, माझ्या प्रचाराला या, असा आग्रह मी करत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. जनतेच्या पाठबळाच्या आधारावर मी निवडणूक लढवत आहे. मात्र माझे नाव जे दाऊदशी जोडत आहेत. त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. मी माझी विचारसरणी बदलणार नाही. माझी माझ्या विचारांशी बांधिलकी आहे, असेही मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेल्या वेळी अणुशक्तिनगर येथून विजयी झालेले नवाब मलिक या निवडणुकीत मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुरुवातीला त्यांना अजित पवार गटाकडून एबी फॉर्म मिळार नाही, असे बोलले जात होते. मात्र नवाब मलिक यांनी अखेरच्या क्षणी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला होता. दरम्यान, या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपची भुमिका काय?
भाजपाचे आमदार व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायचे असे ठरले होते. विषय फक्त नवाब मलिकांच्या उमेदवारीचा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) मलिक यांना मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांबाबत यापूर्वीच आमची भूमिका सांगितली आहे. मी देखील वारंवार भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा एकदा सांगतो की अजित पवारांनी मलिकांना उमेदवारी दिली असली तर भाजपा त्यांचा प्रचार करणार नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा