Friday, November 22, 2024
Homeनगरनादी लागू नकोस, अन्यथा जिरवेन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट इशारा

नादी लागू नकोस, अन्यथा जिरवेन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट इशारा

पारनेर / कर्जत (तालुका प्रतिनिधी)

महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू ‘किस झाड की पत्ती’ आहे. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके यांना पारनेरच्या सभेत इशारा दिला आहे. माझ्या नादी लागलास तर तुझी अशी जिरवेन की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल असंही ते म्हणाले. दरम्यान, कर्जतच्या सभेत त्यांनी आ. रोहित पवार आणि नीलेश लंके यांच्यावर सडकून टीका केली.

- Advertisement -

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी पारनेर आणि कर्जत येथे सभा घेतल्या. भर पावसात पारनेर येथे झालेल्या सभेत ते म्हणाले, लोक म्हणतात आम्ही तुम्हाला पाहून मतदान दिलं, नको त्या माणसाला पारनेरमधून निवडून दिलं. गेल्या आमदारकीला माझी चूक झाली. त्यावेळी तुमच्यातलेच अनेकजण माझ्याकडे आले होते. निलेशला उमेदवारी द्या, अशी त्यांनी मागणी केली. तुमच्यासाठी उमेदवारी दिली, मात्र वाटलं नव्हतं बाबा असे दिवे लावेल. गडी दिसायला बारीक दिसतो, मात्र लय पोहोचलेला आहे. आमदार झाल्यावर त्याची एक एक लक्षणं कळायला लागली. अधिकाऱ्यांना देखील धमक्या देत होता. आम्ही उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलतो आणि हा पट्ट्या पोलिसांनाही तुमचा बाप येतोय अशी धमकी देतो.

निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे कंड जिरवतो, तुझा असा कंड जिरवेन की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल. माझ्या नादी लागू नको. मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, कर्जतच्या सभेत अजित पवार म्हणाले, रोहित पवार यांना राज्याचा नेता होण्याची घाई झाली आहे तर लंके यांनाही लोकसभेत जाण्याची घाई झाली आहे. त्यासंबंधी काहीही माहिती नसताना आणि तयारी नसताना केवळ अट्टाहास आणि कोणी तरी पुढे केले म्हणून लंके निवडणूक लढवित असल्याचे पवार म्हणाले.

हे ही वाचा : चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

गुंडगिरीच्या विरोधात निवडणूक

महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ही निवडणूक पारनेर तालुक्यातील दहशत आणि गुंडगिरीच्या विरोधात आहे. या तालुक्यातील युवकांना आता रोजगार निर्माण करुन देण्यासाठी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : मोदींच्या ‘त्या’ ऑफरवर शरद पवार स्पष्टच बोलले

बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा

लोकसभा निवडणुकीत या निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा. अजूनही कोणी दहशतीत असेल तर त्याला जाऊन सांगा अजित पवार पाठीशी आहे. आधी बोलले असते तर आधीच बंदोबस्त केला असता. आता त्यांना घरी पाठवल्याशिवाय पर्याय नाही. ४ जूनला पेट्या उघडल्यावर लंकेंचं पार्सल घरी पाठवण्याचं काम करा, असं आवाहन पवार यांनी केलं.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या