पुणे | Pune
शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (Court) बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केले. तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलने केली जातील, असेही स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून समोर आलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला आहे. याच घटनांच्या निषेधार्थ ही आंदोलने केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज पुणे स्थानकाबाहेर शरद पवार यांच्या नेतृत्वात मविआच्या (MVA) कार्यकर्त्यांनी तोंडावर काळा मास्क लावून निषेध आंदोलन केले. यावेळी खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळेही उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) परखड शब्दांत टीका केली.
हे देखील वाचा : संपादकीय : २४ ऑगस्ट २०२४ – पर्यावरण पूरकतेकडे पाऊल
यावेळी बोलतांना सुळे म्हणाल्या की,”संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत. न्याय प्रत्येकासाठी समान असायला हवा. बदलापूर, सातारा, कोल्हापूर, दौंड अशा अनेक घटना गेल्या १५ दिवसांत वाढलेल्या आपण बघत आहोत. प्रशासनाकडून अपेक्षित असे सहकार्य सगळीकडे दिसत नाही. अनेक घटना पुन्हा पुन्हा झाल्या आहेत. त्याची नोंद पोलिसांनी घेतली नाही म्हणून ही कृत्य वाढली आहेत. पुण्यातलीच घटना आहे. इथे पोलीस यंत्रणा रक्ताचे नमुने बदलणे, ड्रग्ज प्रकरणात अटकेतला माणूस पळून जातो अशा अनेक घटना दुर्दैवाने राज्यात आणि पुण्यात होत आहेत”, असेही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले.
हे देखील वाचा : त्र्यंबकेश्वरला पावसाची जोरदार हजेरी
पुढे त्या म्हणाल्या की,”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पुण्यात बलात्कार झालेल्या प्रकरणात दोन महिन्यांत आपण त्या नराधमाला फाशी दिली. असे झाले असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ. प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचे. इतके असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. जर सरकारला जमत नसेल तर आपल्या लेकींच्या सुरक्षेसाठी आपण सगळे जबाबदारी घेऊ. मविआचे सगळे पक्ष मिळून ठरवू की सगळे प्रत्येक शाळेत जाऊन तिथे सांगू की काही मदत लागली तर आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. राज्यात कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही याची जबाबदारी आपण आज घेऊ. बदलापूर प्रकरणात आरोपीला फाशी होणार नाही, तोपर्यंत मविआचा कोणताही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. आपण सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या (Girl) सुरक्षिततेसाठी कामाला लागू”, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा