पुणे । Pune
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एकमेव खासदार निवडून आलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीनं (NCP) आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांसाठी अजितदादा गटानं तयारी आणि रणनीती बनवण्यास सुरूवात केली आहे.
त्याच रणनीतीचा भाग म्हणून पक्षाच्या कार्यक्रमात, बॅनर्स, पोस्टर आणि जाहिरातींवर अधिकाधिक गुलाबी रंगाचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे अजितदादा सुद्धा गुलाबी रंगाच्या जॅकेटचा वापर करत आहेत. गुलाबी जॅकेटची (Pink Jacket) सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच अजितदादा यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हे ही वाचा : पवारांचे अकोलेत भांगरेंना बळ; आ. लहामटे यांची डोकेदुखी वाढली
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि तुम्ही जॅकेट सुद्धा गुलाबी रंगाचे वापरत आहात? याबद्दल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं प्रश्न विचारल्यावर अजितदादा म्हणाले, तुला काही त्रास होतोय का? मला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मी कोणते कपडे घालायचे, तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशानं घालतो. तुमच्या कुणाच्या पैशानं घालत नाही. जो सर्वसामान्य माणूस घालतो, त्याच पद्धतीनं मीही पेहराव करतो. माझ्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटते ते करतो. असं अजितदादा म्हणाले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्याने नेमलेल्या नरेश अरोरा यांच्या टीमने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही कँपेनिंग सुरु केली आहे. नरेश अरोरांच्या कंपनीने कर्नाटकमध्ये डी.के शिवकुमार यांच्यासाठी काम केलंय. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यासाठीही अरोरा यांच्या कंपनीनं काम केलंय. दरम्यान आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अरोरा यांची कंपनी काम करतेय.
हे ही वाचा : उद्या लाडकी मेहुणी, लाडका मेहुणा योजना आणतील; मनोज जरांगेंची खोचक टीका
गुलाबी रंग महिलांना आवडतो त्यामुळे गुलाबी कॅम्पेन महिला मतदारांना आकर्षित करणार असाही यामागचा राष्ट्रवादीचा तर्क आहे. पुढील आठवड्यात अजित पवार नगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर लाकडी बहीण योजनेसंदर्भात ते महिलांसोबत संवाद साधणार आहेत. दरम्यान अजित पवारांच्या या दौऱ्यात देखील गुलाबी रंगाच्या कॅम्पेनची झलक दिसण्याची शक्यता आहे.