मुंबई । Mumbai
माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांच्यावर मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
या घटनेने मुंबईसह महाराष्ट्र हादरला आहे. तीन हल्लेखोरांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक हल्लेखोर फरार आहे. यातील दोन हल्लेखोरांची नावं मुंबई पोलिसांनी सांगितली आहेत. यातला एक हल्लेखोर हा उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरियाणाचा आहे. दरम्यान, सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणात एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यांच्या हत्येमागेच संभाव्य कारण समोर आले आहे.
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट हा गेल्या काही महिन्यांपासून रचण्यात येत होता. बाबा सिद्दीकींची हत्या एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा यात हात असल्याचीही माहिती समोर येत आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांची राजकीय वैमनस्यातून कोणी सुपारी दिली होती का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मारिन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाईल. रात्री 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी होईल. यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते येण्याची शक्यता आहे. मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. ही प्रार्थना रात्री 7 वाजता त्यांच्या मकबा हाईट या राहत्या घरी होईल. त्यानंतर त्यांचा बडा कब्रस्तान येथे दफनविधी होईल.