Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNCP Politics: कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या; राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्याची...

NCP Politics: कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या; राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्याची शरद पवारांकडे मागणी

मुंबई | Mumbai
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे बोलले जातेय. अजित पवारांच्या अपघातावरून देखील राजकीय आरोप प्रत्यारोप आणि घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय. अजित पवार यांचा अपघात कसा झाला याची चौकशी सध्या सुरु आहे. त्यामध्ये अंतर्गत बाबींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वातावरण कुलुषित झाले असताना आता नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. कारण पक्षाकडून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात अनेक नेत्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाहीय. केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नाहीय.

- Advertisement -

निवडणुक आयोगाला सादर करण्यात आलेल्या यादीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख आहे. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांची जनरल सेक्रेटरी म्हणून नोंद करण्यात आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे यांची नावे प्रमुख पदांमध्ये नसल्याने उलट-सुलट राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. पण सुनिल तटकरे यांच्या नावासमोर कोणताही उल्लेख केलेला नाही.

असे असतानाच राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार यांची तक्रार करण्यासाठी थेट शरद पवारांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दोन बड्या नेत्यांनी एकाच दिवशी पण स्वतंत्रपणे भेट घेऊन पार्थ पवारांची तक्रार केल्याची माहिती आहे. शरद पवार यांनी कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी, अशी मागणी संबंधित बड्या नेत्याची पवारांकडे केली आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

संपादकीय : १६ मे २०२६ – राष्ट्रवादीतील धुमशान

शरद पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी अशी बड्या नेत्याने शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. आम्ही सुद्धा पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. दादा असताना असे काही घडत नव्हते, पण आता पार्थ पवार वेगळ्या पद्धतीने पक्ष हाताळत आहेत, असे या नेत्याने पवारांकडे मत मांडले. आमचा मान सन्मान राखला पाहिजे असे आम्हाला वाटतय, असे या बड्या नेत्याने पवारांना सांगितले.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची सिल्व्हर ओकवर भेट
सुनील तटकरे हे १२ मे रोजी रात्री शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. तटकरेंच्या या भेटीआधीच प्रफुल पटेल हेदेखील शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या संपूर्ण नाराजीनाट्याबाबत प्रफुल पटेल हे आतापर्यंत मौन बाळगून होते. मात्र, त्यांनीही १२ मे रोजी शरद पवार यांची भेट घेतल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काहीतरी वेगळ्याच हालचाली सुरु आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik APMC News : नाशिक बाजार समिती उपसभापतीपदी प्रल्हाद काकड

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik APMC News) उपसभापतीपदी प्रल्हाद काकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसभापती जगन्नाथ...