अमरावती | Amravati
सुंदर मुलगी तुमच्या माझ्या- सारख्याला भेटत नाही, ती नोकरीवाल्या मुलाला मिळते, दोन नंबरची मुलगी किराणा दुकानदाराला अन् तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याला मिळतो, असे वादग्रस्त विधान अमरावतीच्या मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे. भुयार यांनी केलेल्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले आमदार देवेंद्र भुयार?
नोकरी नसलेल्या, शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मुंबई, पुण्यात नोकरी असणाऱ्या मुलांना विवाहासाठी मागणी वाढत आहे. या प्रश्नाविषयी बोलताना आमदार देवेंद्र भुयार यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, आज जर लग्नासाठी मुलगी पाहिजे असेल तर मुलाला नोकरीवाला पाहिजे. मुलगी स्मार्ट आणि एक नंबर देखणी असेल तर ती मुलगी तुमच्या माझ्यासारख्या पोट्ट्याला भेटणार नाही. ती नोकरी करणाऱ्या मुलांना मिळते. दोन नंबरची मुलगी कोणाला मिळते, ज्यांचा धंदा आहे, पानटपरी, किराणाचे दुकान आहे अशा मुलांना मिळते. तीन नंबरचा जो राहिलेला गाळ आहे तो हेबडली हाबडली जी पोरगी आहे. ती शेतकऱ्यांच्या मुलांना मिळते. म्हणजे शेतकऱ्यांच्या पोराचं खरं राहिलं नाही..माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे सगळा,’ अशी भाषा भुयार यांनी वापरली. एकीकडे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार लाडकी बहीण योजनेचा दणक्यात प्रचार करत असतानाच समर्थक आमदाराने केलेल्या या विधानाने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार यांच्या या वक्तव्याने विरोधकांना चांगलेच कोलीत मिळाले असून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार भुयार यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या, देवेंद्र भुयारचे हे वाह्यात वक्तव्य फक्त महिलांचाच अवमान नाही तर कृषीक्षेत्रामध्ये राबणाऱ्या भूमिपुत्रांची अवहेलना तथा कृषीक्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणारे, शेतकऱ्यांची टिंगल उडवणारे आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांच्याकडून या वाचाळवीरांना अजिबात आवर घातला जात नाही हे दुःखद आहे.
तर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, मला आश्चर्य वाटते ज्या ठिकाणी अजित पवार यांचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो आणि त्याच ठिकाणच्या आमदारांचा महिलांकडे अपशब्द मध्ये बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावे, अशा प्रकारचा महिलांचा वर्गीकरण कोणीही खपून घेणार नाही, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा