Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar: अजित पवारांचा मंत्र्यांना सज्जड दम; इतर कामात व्यस्त राहणार असतील...

Ajit Pawar: अजित पवारांचा मंत्र्यांना सज्जड दम; इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावं…

नागपूर | Nagpur
आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नागपुरात चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी संबोधन करताना आपल्या मंत्र्यांना सज्जड दम भरला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना दिला आहे. नागपूर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदारांसह वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या चिंतन शिबिरातून मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “आपल्या पक्षाच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी चिंतन शिबिरात तुम्हा सर्वांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज माझे मन खूप भरून आले आहे. या सभागृहात आपले जवळपास पाचशे वरिष्ठ पदाधिकारी, नेते, सहकारी उपस्थित आहेत. मी आजूबाजूला पाहतो तेव्हा मला गर्दी दिसत नाही, मला माझे कुटुंब दिसते. तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी लाखो लोक उभे आहेत, आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे मला नव्या उमेदीने, नव्या आशेने पुढे जाण्याची ताकद मिळते.” असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

आराखड्याला नागपूर डिक्लेशेरन म्हणून मांडणार
आज आपण राष्ट्रवादी चिंतन शिबिरासाठी एकत्र आलो आहोत. हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या निवडणुकीसाठी नाही, तर पुढच्या पिढीसाठी आहे. आज फक्त भाषणं करून वेळ घालवायचा नाही. आज प्रामाणिक चर्चा, धाडसी कल्पना आणि ठोस निर्णय घ्यायचे आहेत. आणि आज संध्याकाळपर्यंत आपण सर्व मिळून जो आराखडा ठरवू, त्यालाच आपण Nagpur Declaration (नागपूर डिक्लेरेशन) म्हणून अभिमानाने मांडणार आहोत, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर काम जास्त असतील तर बदल करावा लागेल
यावेळी अजित पवारांनी उपस्थित मंत्री, खासदार, नेत्यांना सज्जड दम ही भरला, ते म्हणाले, पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर काम जास्त असतील तर बदल करावा लागेल, असा सज्जड दम अजित पवारांनी पक्षातील मंत्र्यांना दिला. तसेच ज्यांना ज्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले त्यांना त्या जिल्ह्यात जावेच लागेल. लोकांमध्ये फिरून काम करावी लागतील, काहीजण फक्त झेंडावंदनला जाऊन दिखावा करतात, अशा कानपिचक्यादेखील त्यांनी मंत्र्यांच्या काढल्या. यावेळी अजित पवार म्हणाले की, “याआधी कार्यकर्त्यांनी इतर पक्षात काम केले असेल, पण शिव-शाहू विचारधारा घेऊन आपण पुढे जात आहोत. मी मराठा जातीत जन्माला आलो असलो तरी सर्व समाजाच्या विकासाची जबाबदारी माझी तसेच आपली आहे. आपला पक्ष कुठल्या एका जातीचा, धर्माचा नाही,” असे ते म्हणाले.

प्रत्येकाने ठराविक प्रकारचे संवादाचे टचपॉइंट ठेवले पाहिजेत
अजित पवार पुढे म्हणाले की, मित्रांनो लक्षात ठेवा, संघटना केवळ वरच्या पातळीवरून मजबूत होत नाही, ती तळागाळातून बांधली जाते. म्हणून मी ठामपणे सांगतो, प्रत्येक नेत्याने आणि पदाधिकाऱ्याने काही ठराविक प्रकारचे संवादाचे टचपॉइंट लोकांबरोबर ठेवले पाहिजेत. बुथ-स्तरीय संवाद, प्रभाग सभा, जनसंवाद शिबिरे, राष्ट्रवादी परिवार मिलन, युवक टाउन हॉल, महिला बचतगट बैठक, आणि उद्योग/रोजगार सुविधा शिबिरे… हे आपण वर्षभर शिस्तीने केले, तर आपला पक्ष नेहमी लोकांच्या जवळ राहील. कोणत्याही नागरिकाला असं वाटता कामा नये की राष्ट्रवादीचे नेते केवळ निवडणुकीच्या वेळीच दिसतात.

आपला स्वतःचा इतिहास आहे, ओळख आहे विचारधारा आहे हे कोणी विसरू नये
आपण हे विसरू नये की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. आपला स्वतःचा इतिहास आहे, आपली स्वतःची ओळख आहे आणि आपली स्वतःची विचारधारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर आपण चालतो. धैर्य पण करुणेसह, कार्यक्षमता पण न्यायासह वागणे हीच आपली कार्यपद्धती आहे. आपण महात्मा गांधी, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मौलाना आजाद, बिरसा मुंडा, अहिल्यादेवी होळकर, आणि महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे अहिंसा, जन सन्मान, समानता, सर्वांना हक्काचे शिक्षण, पुरोगामित्व हे आदर्श जपतो. भारताच्या संविधानावर आपलं राष्ट्रवादाचं पायाभूत मूल्य उभं आहे. आणि संविधान आपल्याला दररोज आठवण करून देतं की भारताची ताकद ही विविधतेतील एकता आहे. निवडणुका येत-जात राहतील. जिंकणं-हरणं हा लोकशाहीचा भाग आहे. पण आपल्या मूलयांसोबत तडजोड होऊ नये, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदीजींचेही आभार मानतो
महायुतीसोबतचा आपला सहयोग टिकून आहे. कारण परस्पर सन्मान आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीची सामायिक बांधिलकी आहे. या समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचेही आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वाने देशाला स्थैर्य मिळालं आहे आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी नेहमी मोठं मन दाखवलं आहे. मी कधीही लोकहिताची मागणी मांडली, तर त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी नकार दिला नाही, असे म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : हार्वेस्टरद्वारे ऊस कापणीमुळे उत्पादनात घट नाही

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रति एकर सुमारे 15 टन उस उत्पादनात घट होते, अशी विनाकारण चर्चा घडवून आणण्यात येत आहे....